मुंबई : समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवास आणि अपघातांची संख्या कमी करण्यासाठी देशातील पहिली एआय-आधारित ‘इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे वाहनांच्या वेगावर नियंत्रण येणार असून वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.

समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे, यासंदर्भात सुधाकर आडबाले यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी मानांकनानुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. या महामार्गावर क्रॅश बॅरियर्स, रबर स्ट्रिप्स, साईनबोर्ड आदी सुविधा बसविण्यात आल्या आहेत. तसेच महामार्गावर नियमित पोलीस पेट्रोलिंग तसेच ॲम्बुलन्स पेट्रोलिंग सुरू असून आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय 21 क्यूआरव्ही (क्विक रिस्पॉन्स व्हेईकल) पथके कार्यान्वित असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.

भिवंडी–ठाणे मार्गाचे काम सुरू असून ठाणे-मुंबई उन्नत मार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. प्रवास गतिमान करण्यासाठी विविध जोडरस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच छेडानगर ते आनंदनगर तसेच ठाणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते विकसित करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर किंवा इतर माध्यमांतून निधी उभारण्याचे पर्याय तपासले जात आहेत. आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल, अशीही माहिती राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.