scorecardresearch

समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन लांबणीवर ; वन्यजीवांसाठी बांधण्यात येणाऱ्या उन्नत मार्गाला तडे

एका उन्नत मार्गाला कामादरम्यान तडे गेले असून त्यामुळे आता या मार्गाचे नव्याने काम करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शेलू बाजार, वाशिम असा २१० किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन २ मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उद्घाटन सोहळय़ाची जोय्यत तयारी सुरू केली होती. मात्र सोमवारी अचानक उद्घाटन समारंभ रद्द करण्यात आला. आता समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन थेट दोन महिने लांबणीवर गेले आहे. पहिल्या टप्प्यात वन्यजीवांसाठी बांधण्यात येत असलेल्या एका उन्नत मार्गाला कामादरम्यान तडे गेले असून त्यामुळे आता या मार्गाचे नव्याने काम करण्यात येणार आहे. यासाठी दीड महिना लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्घाटनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम संथगतीने सुरू असून प्रकल्प पूर्णत्वासाठी नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. मुळात २०२१ मध्येच ७०१ किमी लांबीचा हा मार्ग पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोना, टाळेबंदीचा फटका बसल्याने २०२१ चा मुहूर्त चुकला. काम मोठय़ा प्रमाणावर शिल्लक असल्याने शेवटी एमएसआरडीसीने टप्प्याटप्प्यात महामार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला. नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा मार्च २०२२ मध्ये खुला करण्याची घोषणा एमएसआरडीसीने केली होती. मात्र या टप्प्यातील काम पूर्ण न झाल्याने मार्च २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डीऐवजी नागपूर ते वैजापूर, औरंगाबाद असा ३६० किमीचा टप्पा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. यातही शेलू बाजार, वाशिम ते सिंदखेड राजा, बुलढाणा दरम्यानच्या भागात काम अपूर्ण असल्याने तो वगळून हा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र काम अपूर्ण असल्याने पुन्हा एकदा प्रकल्पाचा मुहूर्त चुकला.

तारखांवर तारखा देणाऱ्या आणि त्या चुकविणाऱ्या एमएसआरडीसीने शेवटी पहिल्या टप्प्यात नागपूर ते शेलू बाजार असा २१० किमीचा टप्पा २ मे रोजी वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय घेतला. यासाठीच्या सोहळय़ाची जय्यत तयारी सुरू केली. असे असताना आता उद्घाटनच रद्द करण्यात आले आहे. २ मे चे उद्घाटन तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. पहिल्या टप्प्यात नागपूरपासून १५ किमी अंतरावर वन्यजीवांसाठी एक उन्नत मार्ग बांधण्यात येत आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. या कामाची नुकतीच पाहणी करण्यात आली. त्यावेळी या उन्नत मार्गाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता नव्याने उन्नत मार्गाचे काम करावे लागणार असल्याने उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, या उन्नत मार्गाची तज्ज्ञांनी पाहणी केली असून त्यांनी आता नव्याने बांधकाम करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे नव्याने उन्नत मार्गाची बांधणी करण्यात येणार असून हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड माहिन्यांचा कालावधी लागणार आहे. याअनुषंगाने आता पहिला टप्पा दोन महिन्यानंतर खुला होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samruddhi mahamarg s partial inauguration of 210 km road postponed zws

ताज्या बातम्या