पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरण
निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या जिल्ह्य़ातील व्यावसायिकांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांशी असलेले संबंध चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणातील संशयित सागर चौधरी हा वाळू ठेक्याशी संबंधित असून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर फलक असोत किंवा खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह आ. गुरूमुख जगवानी यांना शुभेच्छा देणारे फलक चौधरीने शहरातील चौका-चौकात लावले होते.
गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या चौधरीने काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. न्यायालयाच्या आदेशाने सादरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. मागील आठवडय़ात सादरे यांनी नाशिक येथील निवासस्थानी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या चिट्ठीत सागर चौधरी याच्या नावाचाही उल्लेख आहे. तसेच सादरे यांच्या पत्नीनेही जळगावच्या भाजप नेत्यांवर आरोप केले होते. यासंदर्भात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चौधरी हा भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले असले तरी चौधरीने याआधी शहरात वेगवेगळ्या कारणास्तव लावलेल्या फलकांमुळे त्याचे भाजपशी असलेले संबंध उघड होत असल्याची चर्चा आहे.

प्रांताधिकारी पल्लवी निर्मल यांच्या विरोधातही वाळू ठेक्यावरून चौधरीने तक्रार दिली होती. चौकशीत ही तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते. चौधरीने राजकीय व्यक्तींशी असलेल्या संबंधांचा वापर करीत त्याला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना अडकविण्याचा प्रयत्न केल्याचे यामुळे उघड होत आहे. या सर्व प्रकरणाचे असलेले राजकीय धागेदोरे लक्षात घेत आप पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा-मेनन यांनी सादरे यांच्या आत्महत्येचा तपास गुप्तचर यंत्रणेकडे वर्ग करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सादरे यांनी लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, जिल्ह्य़ातील वाळू तस्करीच्या तपासासाठी समिती नेमावी, महसूल मंत्री खडसे यांनी सादरे यांच्याविषयी सहानुभूती न दाखविता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.