पूर्णा परिसरातील नांदुरा व जळगाव जामोद तहसीलच्या हद्दीत खाजगी शेतात व शासकीय जमिनीवर हजारो ब्रास रेतीचे दहा मोठे साठे तयार करण्यात आले आहेत. वाळू साठविण्यासाठी शासनाच्या विविध नियम व कायद्यांचे पालन न करता या साठेबाजीतून लाखो रुपये कमविण्याचा गोरखधंदा सर्वत्र वाढला आहे. या सर्व प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी निमगाव येथील शेतकरी श्रीकृष्ण काशिराम दळवी यांनी १९ जूनला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठांना तक्रार अर्ज पाठविल्याने वाळू साठेबाजांची पाचावर धारण बसली आहे.
गेल्या दशकात वाळूचा गोरखधंदा पूर्णा परिसरात फोफावला असून, या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल दररोज होत असल्याने वाळू वाहतूक व साठेबाजीला उधाण आले आहे. पावसाळ्यात पूर्णा नदीला पूर आल्यानंतर वाळूची चढय़ा भावाने विक्री केली जाते.
या माध्यमातून आपले उखळ पांढरे करण्यासाठी अनेक साठेबाज सरसावले असून, पूर्णा परिसरातील येरळी, बेलाड, खरकुंडी, पातोंडा, भोटा, निमगाव, जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव व भेंडवळ येथील खाजगी शेतांमध्ये व शासकीय ई-क्लास जमिनीवर हजारो ब्रास वाळूचे अवैध साठे तयार करण्यात आले आहेत. या सर्व साठेबाजीची पूर्व कल्पना तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांसह खनिकर्म विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आहे. मात्र, अद्यापही साठेबाजांवर कोणतीच कारवाई न झाल्याने या गोरखधंद्यातून लाखोंची उलाढाल करणाऱ्या या रॅकेटला महसूल व खनिकर्म विभागाने मोकळे रान दिल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत असून, श्रीकृष्ण दळवी यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे. वाळूची साठवण करण्यासाठी महसुली अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी, अकृषक शेती, साठवलेल्या वाळू साठय़ाबाबतच्या रॉयल्टी आदींसह विविध आठ ते दहा प्रकारचे परवाने लागतात. मात्र, या साठेबाजांनी काळ्या शेतात, रस्त्यालगत व शासकीय ई-क्लास जमिनीवर हे रेतीसाठे केले आहेत.
या तक्रारीत मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पाठवून सर्व वाळू साठे जप्त करावे व अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी श्रीकृष्ण दळवी यांनी केली आहे.