गोदावरी नदीपात्रातून अवैध आणि अनिर्बंध वाळूउपसा करणा-या तस्करांची मुजोरी चांगलीच वाढली असून, कारवाईची तमा न बाळगता अधिका-यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली आहे. वैजापूरचे उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे व तलाठी साळवे हे दोघे सुदैवानेच या प्रकारातून सुखरूप वाचले. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान पुरणगाव येथे हा प्रकार घडला. ट्रॅक्टर चालक-मालकास वीरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र या प्रकारामुळे महसूल यंत्रणेत मोठी खळबळ उडाली.
वैजापूर तालुक्यातील पुरणगाव येथे गोदावरी नदीपात्रात वाळूचा मोठय़ा प्रमाणात अवैध उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून उपविभागीय अधिकारी भोगे व तलाठी साळवे पथकासह कारवाईस गेले होते. गावात प्रवेश करीत असतानाच पथकाला गावच्या वेशीजवळ समोरून वाळूने भरलेला ट्रॅक्टर येताना दिसला. ते पाहून खाली उतरलेल्या भोगे व साळवे यांनी चालकाला ट्रॅक्टर थांबविण्याचा इशारा दिला. परंतु तो न जुमानता मुजोर चालकाने ट्रॅक्टर तसाच पुढे नेला, मात्र अशा प्रकारे दोन वेळा थांबण्यास सांगूनही चालकाने जुमानले नाही. तिस-या प्रयत्नात मात्र त्याने ट्रॅक्टर थेट भोगे व साळवे यांच्या अंगावर घातला, मात्र प्रसंगावधान राखून या दोघांनीही लगेच बाजूला उडय़ा मारल्या. या वेळी हे दोघेही खाली पडले. त्यामुळेच दोघे बचावले. मात्र, स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात दोघांनाही किरकोळ खरचटले.
स्वत: भोगे यांनीच या प्रकरणी वीरगाव पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन ट्रॅक्टरचालक अमोल अप्पासाहेब ठोंबरे (वय २१, पुरणगाव) याला ताब्यात घेतले. बाभूळगाव येथील वाळूपट्टय़ाचा लिलाव करण्यात आला होता. मात्र, पुरणगाव येथून अवैध उपसा होत असल्याचे अधिका-यांच्या लक्षात आले. दरम्यान, दुपारी घडलेल्या प्रकाराबाबत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती. उपविभागीय पोलीस अधिकारी अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शेषराव पवार तपास करीत आहेत.