Sandeep Deshpande On Sanjay Raut : चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण असं असलं तरी चंद्रपूर महापालिकेत भाजपाचा महापौर झाला आहे. कारण महापौर आणि उपमहापौर पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यामध्ये शिवसेना (ठाकरे) आणि भाजपा हे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या निवडणुकीत महापौर पदी भाजपाच्या संगीता खांडेकर अवघ्या एक मताने तर उपमहापौर पदी ठाकरे सेनेचे प्रशांत दानव ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले.

दरम्यान, शिवसेना (ठाकरे) आणि भाजपाची युती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंद्रपूर महानगर पालिकेतील शिवसेना (ठाकरे) आणि भाजपातील युतीवरून आता मनसे आणि ठाकरे सेनेत चांगलीच जुंपली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि खासदार संजय राऊत हे एकमेकांवर गंभीर आरोप करत असल्याचं दिसून येत आहे. ‘चंद्रपूरमध्ये भाजपाबरोबरची डील आधीच ठरलेली होती’, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ठाकरे सेनेवर हल्लाबोल केला. तसेच एक्सवर एक पोस्ट शेअर करत ठाकरे सेनेला डिवचलं आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले की, “मुळात सुपर प्रवक्त्यांचा विषय असा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरे यांची भिती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला? सुपर उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरचं कांड घडवून आणलं. मात्र, तरीही सुपर प्रवक्त्यांना (संजय राऊतांना) याबाबत कल्पनाही नव्हती. आता चंद्रपूरमधील नगरसेवक तर गेले. मग सुपर प्रवक्तांचं असं झालंय की, आपण लहानपणी एक गोष्ट ऐकायचो ना, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी? अशी अवस्था आता संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे त्यांना असं बोलावं लागतं”, अशी खोचक टीका संदीप देशपांडेंनी केली आहे.

चंद्रपूरमध्ये जे झालं त्यावर कारवाई केली जाईल, असे संकेत संजय राऊतांनी दिले. यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “ते काहीही कारवाई करणार नाहीत. कारण यापुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की, चंद्रपूरमध्ये भाजपाबरोबरची ही डील होणार आहे, हे संजय राऊतांना आधीच माहिती होतं. पण आता काय करायचं? म्हणून ते आगपाखड करत आहेत. कारण जे आपण बोललो त्याच्या विरोधात घडलं? म्हणून मी मारल्या सारखं करतो, तू रडल्या सारखं कर, असं सगळं सुरू आहे. चंद्रपूरमध्ये जे झालं ते सुपर उद्धव ठाकरेंनीच घडवून आणलं आणि हे त्यांच्या सुपर प्रवक्त्यांनाही माहिती आहे”, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

संदीप देशपांडेंनी ट्विट करत ठाकरे सेनेला डिवचलं

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी ठाकरे सेनेने डिवचलं. संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, “ज्या दिवशी जनतेला तुम्ही ‘पन्नास खोक्यांचे’ पुरावे द्याल त्या दिवशी शंभर टक्के चंद्रपूरमधल्या ‘एक खोक्याचा’ पुरावा देणार म्हणजे देणार.”