महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता मुंबईत महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेत मनसे भाजपाला समर्थन देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे खरंच भाजपाला समर्थन देणार का? याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली आहे. आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे भाजपाला समर्थन देणार आहे, अशा चर्चांबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले की, “अशा प्रकारची कुठलीही चर्चा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर झालेली नाही. अशा प्रकारचे कुठलेही समर्थन देण्याचा विषय नाही.” त्यामुळे मनसे मुंबईत भाजपाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

यावेळी राज ठाकरे यांच्याविरोधात भाजपा आमदार तमिळ सेल्वन यांनी घेतलेल्या भूमिकेवर देखील संदीप देशपांडे यांनी भाष्य केले. “राज ठाकरे तमिळ लोकांबद्दल बोललेले नाहीत. तो जो कोण एक भारतीय जनता पक्षाचा नेता आलेला, त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याबद्दल बोलले आहेत. यामध्ये उगाचच मराठी विरूद्ध तामिळ करण्याचा प्रयत्न तमिळ सेल्वन करत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी डोक्यात प्रकाश पाडून घ्यावा,” असे देशपांडे म्हणाले.

मापालिका निवडणुकीनंतर पक्षात काही बदल होणार असल्याचे संकेतही संदीप देशपांडे यांनी यावेळी देले. दर काही दिवसांनी पक्षामध्ये बदल होत असतात. त्याप्रमाणे बदल होतील. निवडणुकीचा अनुभव, निवडणुकीत कोणी काम केलं, नाही केलं याची चर्चा या बैठकीत झाली असेही संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.