Sandeep Deshpande On Raj Thackeray-Uddhav Thackeray : राज्यातील काही नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सध्या राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. यातच दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (२७ नोव्हेंबर) राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीत नेमकी काय ठरलं? याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

या सर्व घडामोडींवर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना मोठं भाष्य केलं आहे. ठाकरे बंधू एकाच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर आणि मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल? यावर संदीप देशपांडे यांनी भाष्य करत सविस्तर भूमिका मांडली आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गुरुवारी भेट झाली. यावेळी दोन तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाल्याचं बोललं जातंय. या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरे बंधूंचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का आणि दुसरी चर्चा म्हणजे दोन्ही पक्ष (शिवसेना ठाकरे गट आणि मनसे) एकाच चिन्हावर निवडणुका लढवतील का? असा प्रश्न पत्रकारांनी संदीप देशपांडे यांना विचारला.

यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “मला असं वाटतं की संक्रांत ही १४ जानेवारीला असते. त्यामुळे आतापासून लोकांनी पतंग उडवू नये. या सर्व चर्चा ज्या आहेत त्या चर्चा पतंगबाजीच्या चर्चा आहेत. काय चर्चा झाली? ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना माहिती आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली हे आपल्या कोणालाही माहिती नाही. पण मी एवढं नक्की सांगू इच्छितो की अजून संक्रांतीला वेळ आहे, त्यामुळे एवढ्यात कोणी पतंग उडवू नये”, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

मनसे-ठाकरे गटात जागावाटपाबाबत काय ठरलं?

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात जागावाटपाबाबत नेमकं काय ठरलं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संदीप देशपांडे म्हणाले की, “मला असं वाटतं की या गोष्टीचं उत्तर आता कॅमेऱ्यासमोर देणं योग्य ठरणार नाही. योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ.”

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीबाबत राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. युतीबाबत चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, ही भेट महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असल्याचं सांगितलं जात आहे.