Sandeep Deshpande : राज ठाकरे हे नेहमी भूमिका बदलतात. अनेकदा त्यांची भूमिका कळत नाही. ते आता महाराष्ट्राचे दुश्मन असलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबरोबर आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेला आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संदीप देशपांडे यांनी आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांच्या टीकेबाबत विचारण्यात आलं. याबाबत बोलताना, २०१९ पूर्वी तुम्ही याच मोदी आणि शाहांच्या बरोबर होतात, तेव्हा ते महाराष्ट्र विरोधी नव्हते का? असा प्रश्न त्यांनी संजय राऊतांना विचारला.
हेही वाचा – Sanjay Raut : मविआचं जागावाटपाचं ठरलं? मुंबईत ठाकरे गटाला २२ जागा? संजय राऊत सविस्तर माहिती देत म्हणाले…
नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे?
“संजय राऊत यांचा बुद्ध्यांक कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना आमची भूमिका कळत नाही. शिवसेना उबाठा हा अपंगांचा पक्ष आहे. आयुष्यभर ते लोकांच्या कुबड्या घेऊन चालले. २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी भाजपाच्या कुबड्या वापरल्या, नंतर शरद पवार आणि काँग्रेसच्या कुबड्या वापरल्या. त्यामुळे चालणं काय असतं हे त्यांना माहिती नाही. त्यांनी आजपर्यंत जे यश मिळवलं आहे. ते कुबड्यांवर मिळालं आहे”, असं प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊतांना दिलं.
“महाराष्ट्र प्रेमावर बोलावं, ही संजय राऊतांची लायकी नाही”
पुढे बोलताना, “एखादी भूमिका घेतल्यानंतर ते महाराष्ट्राच्या हिताची आहे की नाही, हे ठरवणारे संजय राऊत कोण? हा अधिकार संजय राऊतांना कुणी दिला? महाराष्ट्र प्रेमावर बोलावं, ही संजय राऊतांची लायकी नाही. ज्यांनी आयुष्यभर शरद पवारांची धुणी भांडी केली. ते आता आम्हाला शिकणार का? आम्ही काय आहोत ते महाराष्ट्राची जनता ठरवेल”, असेही ते म्हणाले.
“…तेव्हा मोदी-शाह चांगले होते का?”
दरम्यान, राज ठाकरे हे बाळासाहेबांचा पक्ष फोडणाऱ्यांबरोबर काम करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती. यावरही संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडणाऱ्यांसोबत आधी कोणी काम केलं? मोदी- शाह यांच्याबरोबर कोण होतं? हे आधी संजय राऊत यांनी बघावं. तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर होते, तेव्हा ते चांगले होते का? मुख्यमंत्री पद दिले नाही म्हणून ते वाईट झाले? मुळात एवढा अपमान करूनही ते नालायकांसारखे त्यांच्याबरोबर सत्तेत होते”, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.