Sandeep Deshpande Lalbaugcha Raja Ganeshotsav statement : गेल्या वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सल्लागार पदी अनंत अंबानी यांची नियुक्ती करून संपूर्ण लालबागभर रिलायन्सच्या जाहिराती लावल्या होत्या. आता यंदा चिंचपोकळीच्या मंडळाचा अदाणी समूहाबरोबर करार झाला आहे. त्यामुळे चिंचपोकळीभर अदाणीच्या जाहिराती लागणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान, यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. लालबागचा राजा मंडलाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांची ही सर्वांत मोठी चूक असून त्यांना इतिहासात कोणी माफ करणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले.

संदीप देशपांडे म्हणाले, “गणेशोत्सव आमचा सण होता. पण गणेशोत्सव मंडळं कॉर्पोरेट वॉरचा भाग होत असतील तर यापेक्षा दुर्दैवं नाही. उद्या गणपतीत गरबा बघायचा आहे का? याची सुरुवात मागच्या वर्षी लालबागच्या राजा मंडळाने केली. ही अत्यंत दुर्देवी गोष्ट आहे. मला हे पटूच शकत नाही.” संदीप देशपांडे यांनी आज विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला.

“गणेशोत्सव मोठ्याने साजरा करायला पैसे लागतात हे मान्य आहे, पण किती लागतात? आज लागबागच्या राजाला करोडे रुपये जमा होतात. लोक स्वतः येऊन देणग्या देतात. मग कशाला तुम्हाला अंबानी पाहिजे? काय मोठा सल्ला अनंत अंबानी देतात? जो इतके वर्षे मिळाला नाही. अनंत अंबानी असा कोणता सल्ला देतात ज्याकरता त्यांना सल्लागार म्हणून नेमलं आहे? गणेशोत्सव मंडळ कंपनी करायची आहे की, ज्यात अनंत अंबांनीना सल्लागार केलं आहे. त्यांचं बघून अदानी आले. उद्या जेएसडब्ल्यू येईल, मग गोदरेज येईल. मग गणेशोत्सव मंडळ कॉर्पोरेट वॉरचं ठिकाण बनवायचं आहे का? असा संतप्त सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

“हा मराठी मातीतला सण आहे, तो उद्योगपतींच्या हातात द्यायचा आहे का? आम्ही गणपतीत गरबा चालू करायचा का? आमचे महाराष्ट्रातील मराठी माणसाचे सण गुजराती कंपन्यांच्या हातात देणार आहात का. लाबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यात दोषी असून इतिहास त्यांना कधीच माफ करणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. ते माझे चांगले मित्र आहे. ही भूमिका अत्यंत चुकीची भूमिका आहे. अदाणी किंवा अंबानी हे बिझनेसमन आहेत. नफ्याशिवाय ते काहीच करणार नाहीत. गणपती, गणेशोत्सव आणि मंडळ हे मार्केटिंगचं ठिकाण आहे का? माझा तर संताप होतो. माझी मराठी गणेशोत्सव मंडळांना हात जोडून विनंती आहे की याचा कृपया नीट विचार करा. आत्मपरिक्षण करा, आपण योग्य करतोय का. नाहीतर काही वर्षांनी लालबागाच्या राजाचं नाव अंबानी गणपती असेल आणि चिंचपोकळीच्या चिंतामनीचं नाव अदाणी गणपती असेल. हे तुम्हाला पाहिजे का, चालणार आहे का? याचा विचार मंडळातील मराठी मुलांनी केला पाहिजे”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

उंच मूर्तीबाबतही मांडलं देशपांडेंनी मत

“मूर्ती किती उंच असावी, का असावी. उंच मूर्ती बनवून त्याची निगा राखू शकतो का? याचा विचार व्हायला हवा. आज त्या कुटुंबावर दुःख कोसळलं असेल, ज्यांचा यात मृत्यू झाला. बाप्पााला काय वाटलं असेल की माझ्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. ही कोणती स्पर्धा आहे? दोन फुटांचा गणपती तुमच्या इच्छा पूर्ण करत नाही का? असा सवाल उपस्थित करत यातही त्यांनी उद्योग समूहांवर टीका केली. उद्या ५० फुटांची मूर्तीही बनवली जाईल, कारण पैसे द्यायला अंबानी आणि अदाणी आहेत, असं ते म्हणाले.