अकोले: तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना आज, गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. ही घटना जम्मू-काश्मीरमधील किस्टवाड सेक्टरमध्ये घडली. दरम्यान शहीद संदीप गायकर यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ब्राह्मणवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ते मराठा बटालियनमध्ये होते. त्यांच्यामागे पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. संदीप गायकर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. गायकर यांच्या बलिदानाने संपूर्ण अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी जम्मू- काश्मीरच्या ‘किस्टवाड सेक्टर’मध्ये आठ दहशतवाद्यांच्या शोधासाठी ‘१७ आर आर बटालियन’ने शोधमोहीम सुरू केली होती. या दरम्यान चार दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. मात्र, या वेळी चकमकीत गायकर शहीद झाले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गायकर यांचे पार्थिव उद्या, शुक्रवारी संध्याकाळी पुणे विमानतळावर आणले जाईल. त्यानंतर शनिवारी सकाळी लष्करी इतमामात त्यांच्यावर ब्राह्मणवाडा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रप्रेमी सैनिक होते. कर्तव्य बजावताना त्यांनी प्राणाची आहुती देऊन देशसेवा केली. संपूर्ण देशाला सदैव त्यांचा अभिमान राहील, अशा शब्दांत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.