सांगली : जिल्ह्यातील आष्टा नगराध्यक्ष पदाची निवडणुक वगळता अन्य ठिकाणी बहुरंगी, बहुढंगी लढती होत आहेत. आठ नगराध्यक्षपदासाठी ४१ आणि १८१ सदस्य पदासाठी ५९४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांना घेरण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले असून आष्टा येथे शहर विकास आघाडीच्या नावाखाली आमदार पाटील व शिंदे गट एकत्रितपणे महायुतीच्या विरोधात मैदानात उतरला आहे.
जिल्ह्यातील ईश्वरपूर, आष्टा, पलूस, जत, तासगाव व विटा या सहा नगरपालिका, आटपाडी, शिराळा नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. शुक्रवारी उमेदवारी मागे घेण्याची मुदत होती. या मुदतीत अनेक राजकीय घडामोडी होउन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या २६ जणांनी माघार घेतल्याने आता नगराध्यक्ष पदाच्या लढतीत ४१ उमेदवार उरले आहेत. आष्टा नगरपालिकेसाठी महायुतीकडून मैदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवीण माने आणि शहर विकास आघाडीचे विशाल शिंदे यांच्यात लढत होत आहे.
जिल्ह्यात लक्ष्यवेधी ठरलेल्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आनंदराव मलगुंडे आणि भाजपचे विश्वनाथ डांगे यांच्यातील सामना रंगणार आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे सागर मलगुंडे यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. यामुळे आता ही लढत दोघामध्येच रंगणार असली तरी अन्य ४ उमेदवार रिंगणात आहेत. विट्यात शिवसेना विरूध्द भाजप अशी लढत होत असली तरी या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. तर तासगावमध्ये नगराध्यक्ष पदाच्या लढतीसाठी ५ उमेदवार मैदानात असले तरी राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजप आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांची स्वाभिमानी विकास आघाडी अशी तिरंगी लढत रंगतदार होत आहे.
पलूसमध्ये काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यात तिरंगी लढत होत असून महिला गटासाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी असल्याने मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे. महायुतीकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून दोन्ही राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. अभिजित नाईक व पृथ्वीसिंग नाईक या दोघामध्येच नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत असली तरी आठ उमेदवार रिंगणात आहेत.
शिराळा नगरपंचायतीसाठी तीन दांपत्य निवडणूक रिंगणात उतरले असून केदारसिंग नलवडे व पत्नी शिवानी नलवडे, प्रा. सम्राट शिंदे व प्रेमला शिंदे आणि वसंतराव कांबळे व नेहा कांबळे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आटपाडी नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत असून ४ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत तीर्थक्षेत्र विकास आघाडी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी होत आहे. सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या अशी ईश्वरपूर- ९४, विटा- ६९, आष्टा- ७२, तासगाव ८८, जत ९४, पलूस ६७, शिराळा नगरपंचायत ५० आणि आटपाडी नगरपंचायत ६० असे एकूण ५९४ उमेदवार अडीच लाख मतदारांना सामोरे जात आहेत.
