रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू असतानाच संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवाशांनी चक्क गणरायाचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामां’च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने मागणी मांडली. या आंदोलनाची स्थानक परिसरात चर्चा रंगली.
गणेशोत्सवाच्या काळात संगमेश्वर रोड स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा नसल्याने प्रवाशांना अन्य स्थानकांवर जावे लागते. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडील तक्रार वहीत चार एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी नोंदविली.
प्रवाशांनी १०११५/१०११६ बांद्रा–मडगाव एक्स्प्रेस, १६३११/१६३१२ श्री गंगानगर एक्स्प्रेस, १२९७७/१२९७८ अजमेर–एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि ०२१९७/०२१९८ जबलपूर–एर्नाकुलम/कोयंबतूर एक्स्प्रेस या चार गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा देण्याची मागणी केली आहे.
या गाड्यांना थांबा मिळाल्यास संगमेश्वरसह संपूर्ण तालुक्यातील प्रवाशांना मुंबई, राजस्थान, उत्तर भारत, मध्य प्रदेश, केरळ आणि दक्षिण भारताच्या दिशेने रेल्वे प्रवासाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या सणांच्या काळात मुंबईसह अन्य शहरांतून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फायदा होईल.
प्रवाशांची मागणी तक्रार वहीपुरतीच मर्यादित न राहता रेल्वे प्रशासनाच्या निर्णयापर्यंत पोहोचणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ‘उंदीरमामां’च्या या अनोख्या साकड्याची रेल्वे प्रशासन कितपत दखल घेते, याकडे संगमेश्वरवासीयांचे लक्ष लागले आहे.
