संगमनेर : नेपाळमध्ये महाप्रलय होऊन अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तेथे पर्यटनासाठी गेलेल्यांचे येथील नातेवाईक गर्भगळीत झाले. मात्र कालांतराने त्यांच्याशी संपर्क होऊन सर्वजण सुखरूप असल्याचे कळाल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. प्रशासनाचाही त्यांच्याशी संपर्क झाला असून ते सर्व लोक आता परतीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली.

शहरालगतच्या घुलेवाडी येथील निर्मला गुंजाळ या त्यांच्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत सहलींचे गेल्या अनेक वर्षांपासून आयोजन करतात. सध्या सुमारे ४५ पर्यटकांना घेऊन त्या स्वतः नेपाळ सहलीला गेलेल्या आहेत. त्यामध्ये अहिल्यानगरसह नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांचा समावेश आहे. संगमनेरमधील निवृत्त शिक्षक हिरालाल पगडाल, त्यांच्या पत्नी आणि अन्य आठ ते दहा व्यक्ती या सहलीत सहभागी झालेल्या आहेत.

दि. २४ ऑगस्टला हा जथ्था नेपाळमध्ये पोहोचला होता. इथले नातेवाईक दैनंदिन त्यांच्या संपर्कात होते. सगळे काही आनंदात चालू असताना अचानक २६ तारखेला दुपारनंतर नेपाळमध्ये झालेल्या महाप्रलयाच्या बातम्या विविध माध्यमातून झळकल्या. त्या बातम्या पाहून नातेवाईकांच्या काळजात धस्स झाले. लगोलग फोनाफोनी सुरू झाली. काहींचे फोन लागले, तर काहींचे फोन न लागल्याने चिंतातूर वातावरण तयार झाले. अखेर संपर्क होऊन सगळे सुखरूप असल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. सगळे पर्यटक सुखरूप असले तरी त्यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे.

ट्रॅव्हल कंपनीने ज्या हॉटेल्समध्ये त्यांचे राहण्या – खाण्याचे आगाऊ बुकिंग केले होते, त्यातली काही हॉटेल या प्रलयात नष्ट झाली. तर काही हॉटेल व्यवस्थापनाने सुविधा देऊ शकत नसल्याने आरक्षण रद्द केले. अचानकपणे उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे ज्या हॉटेल्समध्ये खोल्या शिल्लक आहेत, त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. याशिवाय नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाइन व्यवहार करणे दुरापास्त होऊन बसले आहे. अशा स्थितीत पर्यटकांची व्यवस्था कशी आणि कोठे करावी या विवंचनेत निर्मला गुंजाळ आणि त्यांचे सहकारी सापडले आहेत. या संकटावर कशीही मात करता येईल, परंतु ज्यावेळी घटना घडली त्यावेळी आम्ही उंच ठिकाणी असल्याने जीव वाचला हे सर्वात महत्त्वाचे अशी भावना सहलीत सहभागी पर्यटकांची झालेली आहे.

प्रशासनाचा संपर्क

निर्मला गुंजाळ या आपल्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत सुमारे ४५ पर्यटकांना घेऊन नेपाळ सहलीला गेल्या आहेत. तेथे उद्धवलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर या सहलीबाबत माहिती मिळाली. प्रशासनाने तात्काळ नातेवाईक आणि काही पर्यटकांशी संपर्क केला असून ते सर्व सुखरूप आहेत. नेपाळमध्ये सध्या प्रवासावर काही निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे सर्व पर्यटक आता परतीच्या मार्गावर असून लवकरच ते सुखरूप आपापल्या घरी पोहोचतील. –धीरज मांजरे, तहसीलदार, संगमनेर

हेही वाचा

उद्या परतीच्या मार्गावर

वृत्तवाहिन्यांवर नेपाळमधील महापुराची बातमी पाहून आम्ही प्रचंड घाबरलो होतो. आपण तात्काळ पत्नी निर्मला गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला. पहिल्याच प्रयत्नात त्यांचा संपर्क होऊन पोखरा या उंच ठिकाणावर असल्याने आम्ही सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. तेथील बरेच रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व पर्यटक आज, शुक्रवारी रात्री लुंबिनी येथे मुक्काम करून उद्या, शनिवारी परतीच्या मार्गाला लागतील. पर्यटकांची संख्या मोठी असल्याने आर्थिकसह काही समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु त्यातूनही मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. –राजेंद्र गुंजाळ, (सहल आयोजक निर्मला गुंजाळ यांचे पती)