संगमनेर: शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नागरिक, महिला, विद्यार्थिनी, युवकांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध करत कोल्हार-घोटी मार्गावरील तळेगाव दिघे फाट्यावर आज, बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. संगमनेर तालुक्यात नेमके चाललेय काय ? असा प्रश्न करत आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारने कडक कायदे करावेत अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली.
आंदोलनात नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, बाळासाहेब गायकवाड, पद्मा थोरात, विक्रम ओहोळ, निलेश थोरात, शरद नाना थोरात, अर्जुन काशीद, सरपंच श्रीनाथ थोरात, रूपाली थोरात, अरुण कुळधरण, अहिल्या ओहोळ, सविता ओहोळ, बाळासाहेब गडगे, गणेश गडगे, मुलीचे मामा रवींद्र मैड, सुधीर थोरात,आबासाहेब थोरात, रावसाहेब जंबुकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी होते. आरोपीला तातडीने अटक करा, संबंधित मुलीला न्याय द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलनात बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या की, लहान मुलीवर झालेला ॲसिड हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपीला प्रशासनाने तातडीने शोधून कठोर शिक्षा केली पाहिजे. जेणेकरून पुढचा आरोपी असे गुन्हा करणार नाही. परवाच पठार भागातील एका युवतीवर चाकूने हल्ला झाला. काल ॲसिड हल्ला झाला. संगमनेर तालुक्यात चालले काय ? अशी विचारणा त्यांनी केली. प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे जात आहेत आणि अशा वेळेस अशा प्रकारचे विकृत मनोवृत्तीचे दर्शन करून महिलांची मानसिकता खराब करण्याचे काम काही समाजकंटक करत आहेत.
नगराध्यक्ष डॉ. तांबे म्हणाल्या, संगमनेर शहरात महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी रक्षक दल निर्माण केले आहे. त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा निर्माण करावे लागतील. यावेळी अर्जुन काशीद, श्रीनाथ थोरात, नीलम खताळ, रूपाली थोरात,पद्मा थोरात आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी निवेदन स्वीकारत आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी पोलीस काम करत असल्याचे ते म्हणाले.
अद्याप धागेदोरे नाहीत
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाची १० पथके तयार करून कार्यरत आहेत. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण, पीडितेकडील माहिती व अन्य सर्व बाजूंनी सखोल तपास करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत आरोपी उघड झालेले नाहीत. तयार केलेली पथके, सायबर टीम, फॉरेन्सिक टीम आरोपीच्या शोधासाठी कसून तपास करत आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. -सोमनाथ वाकचौरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक.
