संगमनेर: दोन लाख रुपयांच्या नोटांच्या बदल्यात तब्बल आठ लाखांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवणारी टोळी संगमनेर पोलिसांनी उघडकीस आणली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी एकाला अटक केली आहे, तर तिघे पसार झाले. आरोपींकडून काही खऱ्या नोटांसह १२ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि १४ लाख किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल, रविवारी सकाळी शहरातील जनतानगर परिसरातून एक मोटार (एमएच. ५६ ए-४४२३) भरधाव वेगाने जात होती. चालकाने वाहतूक नियम तोडत एका दुचाकीस्वाराला कट मारला. काही नागरिकांनी कार अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग आणखी वाढवला. या गडबडीत एका व्यक्तीला कारचा धक्का लागल्याने गोंधळ उडाला. संशय आल्यावर काही तरुणांनी मोटारीचा पाठलाग सुरू केला.
पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मोटार अडवत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता बॅगांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल आढळले. तपासात या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी दोन लाख रुपयांच्या नोटांच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवले होते. या बनावट नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा लावून मध्ये ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छापलेल्या खेळण्यातील नोटांचा वापर करून फसवणूक केली जात होती.
पोलीस अंमलदार सागर नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयुर किशोर सिद्धपुरा (वय ३८, रा. खामगाव) याला अटक केली तसेच त्याच्यासह उमेश कांबळे (रा. खामगाव), संदीप धडमवार (रा. नाशिक) आणि गोलू उर्फ शंकर गिरी (रा. शेगाव) या तीन जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे तिघे पसार झाले आहेत.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम, १४ लाख रुपये दर्शनी मूल्याचे बनावट नोटांचे बंडल्स, १० लाख रुपये किमतीची मोटार, तीन मोबाईल आणि इतर साहित्य असा ऐवज जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत पुढील तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीत गोलू शंकर गिरी (रा. शेगाव) याच्या सांगण्यावरून या बनावट नोटा संगमनेरमध्ये एका व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोपी आल्याची माहिती समोर आली.
