संगमनेर : शहरात हनुमान जयंती आज, गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमानाचा रथ महिलांनी ओढण्याची ब्रिटिशकालीन परंपरा यंदाच्या मिरवणुकीतही कायम राहिली. प्रारंभी आमदार अमोल खताळ आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते हनुमानाची आरती करण्यात आली. त्यानंतर शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हनुमानाचा रथ ओढत मिरवणुकीस प्रारंभ केला.

वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी भगवा ध्वज हातात घेत पोलीस ठाण्यापासून हनुमान मंदिरापर्यंत आले. त्यांनी आणलेला भगवा ध्वज सजवलेल्या रथावर विधिवत फडकवून पवनपुत्र हनुमानाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, नीलम खताळ यांच्यासह शेकडो महिलांनी एकजुटीने रथाचा दोर हातात घेत चंद्रशेखर चौकातून रथ ओढला. चं

द्रशेखर चौक, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगरपालिका, चावडी चौक, जुना कटारिया बाजारपेठ, तेलीखुंट, नेहरू चौक या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. अखेरीस मोठ्या मारुती मंदिराजवळ या सोहळ्याची सांगता झाली. मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त होता. श्रीरामनवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.

असा आहे इतिहास

हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा शहरात पुरातन कालापासून आहे. मात्र देश पारतंत्र्यात असताना १९२७ साली पोलिसांनी मिरवणूक न काढण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पुढची दोन वर्ष मिरवणुकीमध्ये पोलिसांनी अडथळे आणले. पुढे १९२९ मध्ये ब्रिटिश पोलिसांनी मिरवणूक काढण्यास बंदी आदेश लागू केला. भाविकांसाठी हा धक्काच होता. मात्र या दडपशाहीला न जुमानता १९२९ च्या पहाटेपासूनच एकएक करत अनेक लोक हनुमान रथाजवळ दाखल झाले. मात्र सशस्त्र पोलिसांनी संपूर्ण मंदिराला वेढा दिला होता.

पोलीस लोकांना पिटाळून लावत असताना अचानकपणे झुंबराबाई अवसक, बंकाबाई परदेशी यांच्यासह काही महिलांनी रथाचा दोर हाती घेतला आणि ‘बजरंग बली की जय ‘ अशी घोषणा देत रथ ओढायला सुरुवात केली. क्षणार्धात शेकडो महिला रथाच्या दिशेने धावल्या आणि रथ पुढे ओढला गेला. स्त्रियांनी पुकारलेल्या या बंडा पुढे ब्रिटिश पोलिसांनाही हात टेकावे लागले. तेव्हापासून महिलांनी रथ ओढण्याची परंपरा आजतागायत कायम आहे. सन्मान, त्या प्रसंगाची आठवण म्हणून शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानाचा भगवा हातात घेऊन मंदिराकडे जातात. तो भगवा रथावर फडकवत महिला रथ ओढत मिरवणुकीस सुरुवात करतात.