संगमनेर: आमदार अमोल खताळ यांच्या अडचणीत एका न्यायालयीन प्रकरणामुळे मोठी वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकारणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवताना, सर्वोच्च न्यायालयाने खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे खताळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात कायदेशीर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी आमदार खताळ यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान खताळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कराची थकबाकी लपवल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. थोरात यांच्या बाजूने वकील अमित कारंडे यांनी न्यायालयात मुद्दा मांडला की, खताळ यांची ‘नीलकमल’ नावाची भागीदारी संस्था असून त्याचा ५४ हजार रुपयांचा व्यावसायिक कर थकीत होता. ही माहिती प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली.

यावर खताळ यांनी आपण या फर्मचे भागीदार नसून ती विसर्जित झाल्याचा दावा केला होता. मात्र, थोरात यांच्या वकिलांनी जीएसटी संकेतस्थळावरील अधिकृत नोंदी सादर करत ही फर्म अद्याप सक्रिय असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.याप्रकरणी खताळ यांनी थोरात यांची याचिका सुरुवातीलाच रद्दबातल ठरवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, परंतु न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाने तो फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तिथेही त्यांना दिलासा न मिळता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर नियमित सुनावणी व खटला चालणार आहे. थोरात यांचे वकील ॲड. अमित कारंडे यांनी सांगितले की, निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे हा गंभीर गुन्हा असल्याने पुढील सहा महिन्यांत या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे.

सलग आठ पंचवार्षिक निवडणुका जिंकून राज्याच्या मंत्रिमंडळात थोरात यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली होती. त्यांचा पराभव करून निवडून येत आमदार झालेले अमोल खताळ प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र आता निवडणूक प्रतिज्ञापत्रातील त्रुटी आणि थकबाकीच्या मुद्द्यावर ते कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत.