संगमनेर : निळवंडे धरण हे आपल्या जीवनातील ध्यासपर्व मानून आपण सातत्याने काम केले. विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून धरण व कालव्यांच्या कामासाठी निधी मिळवला व काम सुरू ठेवले. आता उजव्या व डाव्या कालव्यातून आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने स्वप्नपूर्ती झाली असून, कालव्यांच्या वरील भागातील जे शेतकरी आहेत, त्यांनाही पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

तालुक्यातील घुलेवाडी येथे जलपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच निर्मला राऊत, भाऊसाहेब पानसरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पानसरे, भास्कर पानसरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी गावातील तरुणांनी वाजत गाजत थोरात यांची भव्य मिरवणूक काढून भेंडाळे बंधारा येथे साडीचोळी अर्पण करून पाण्याचे पूजन केले. यावेळी थोरात म्हणाले की, निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात आता जलसमृद्धी निर्माण झाली आहे.

अनेक गावांना या धरणाचे पाणी मिळाले असून, कालव्यांच्या वरच्या बाजूस असलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही पाणी मिळवून देण्यासाठी आपण आराखडा तयार केला. सत्ता बदलली तरी या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. दुष्काळी भागातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देणे हे आपले स्वप्न असून, त्यासाठी काम करत आहोत. आवश्यक तेथे थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपली यंत्रणा देऊन चारी खोदून बंधारे भरून देण्यात आले. अनेक ठिकाणी पाईप देऊन पाणी उचलले गेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरपंच राऊत म्हणाल्या की, माजी मंत्री थोरात यांच्यामुळेच निळवंडे धरणाचे पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सर्वांना मिळाले आहे. याप्रसंगी गावातील नागरिकांनी मनोगत व्यक्त करत पाणी मिळवून दिल्याबद्दल थोरात यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.