संगमनेर : एका अज्ञात व्यक्तीने शालेय विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर ॲसिडसदृश्य द्रव फेकण्याचा खळबळजनक प्रकार घडला. आज, मंगळवारी दुपारी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात ही घटना घडली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.
जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली. दरम्यान तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहेत.
हल्ल्यात जखमी झालेली मुलगी तिच्या कुटुंबियांसमवेत संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका गावात नातेवाईकांकडे राहते. जखमी झालेल्या शालेय विद्यार्थिनीचे वय साधारण १२ वर्षे असून ती इयत्ता सहावीच्या वर्गात शिकते. शाळेपासून तिचे घर लांब असल्याने ती सायकलवरून शाळेत ये-जा करते. शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे ती मुलगी सायकलवरून घरी जात होती.
शाळेपासून काही अंतर पुढे गेल्यानंतर दुचाकीहून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्या चेहऱ्यावर ॲसिडसदृश्य द्रव पदार्थ फेकला. त्यात तिचा चेहरा भाजला असून हातालाही जखमा झाल्या आहेत. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर तेथून पळून गेला होता. तिला प्राथमिक उपचारांकरता प्रथम एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोरांचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोनवणे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंके, पोलिस उपनिरीक्षक शालोमन सातपुते आदी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला. शालेय विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर ज्वलनशील फेकण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असून पोलीसांना याबाबत तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिथे घटना घडली तिथे सीसीटीव्ही नाहीत. पोलिसांनी विशेष पथक नेमून घटनेचा तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.
आमदार खताळ यांच्याकडून विधिमंडळात प्रश्न
आमदार अमोल खताळ यांनी आज विधानसभेत या घटनेचा विषय उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून या विद्यार्थिनीला सर्वेातोपरी मदत करण्याची ग्वाही सभागृहात दिली.
डॉ जयश्री थोरात यांच्याकडून जखमी मुलीची भेट
युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थिनीची भेट घेतली. मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. या घटनेतील गुन्हेगारांना शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
