संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथे इ. सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या घटनेला पंधरवाडा लोटूनही पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश आले नाही. आरोपीचे रेखाचित्र जाहीर करूनही काहीही साध्य झाले नाही. जिल्ह्यासह राज्यात चर्चिला गेलेल्या या संतापजनक प्रकारातील आरोपीचा शोध घेता न आल्याने तपास यंत्रणेबाबत जनतेत नाराजीची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने आरोपीची ओळख पटवणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीस २ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत पीडित मुलगी दुपारी शाळेतून घरी परतत होती. एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अचानक ॲसिड फेकले आणि तिथून पळ काढला. या भीषण हल्ल्यात मुलगी गंभीररीत्या भाजली. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
ज्या परिसरात ही घटना घडली, तिथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत. तसेच मुलगी एकटीच असल्याने या घटनेचा प्रत्यक्षदर्शी पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली, अनेकांचे जबाबही नोंदवले, परंतु अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता आलेले नाही. मुलीला नक्की कोणत्या कारणातून लक्ष्य करण्यात आले, याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे.
तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी पीडित मुलीने दिलेल्या वर्णनावरून संशयित आरोपीचे रेखाचित्र (स्केच) प्रसिद्ध केले आहे. हे रेखाचित्र जिल्ह्यातील सर्व प्रमुख ठिकाणी, समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले, मात्र त्याचाही उपयोग झालेला दिसत नाही, त्यामुळे पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. यासोबतच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या व्यक्तीबाबत कोणासही काही माहिती मिळाल्यास किंवा ओळख पटल्यास त्यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गुप्त ठेवले जाईल.
या प्रकरणाच्या माहितीसाठी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या ०२४१-२४१६१११ या क्रमांकावर किंवा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी (९८२३२५६९४९), पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे (८२०८४४६२९३) आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे (९१७५२६४९२८) यांच्याशी संपर्क साधता येईल. गुन्हेगाराला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
