संगमनेर : शौचालयासाठी शेतात जाण्यावरून झालेल्या वादानंतर संगमनेर तालुक्यातील कर्जुलेपठार येथे एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हल्ल्यात मयत महिलेची नणंदही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुपाली ज्ञानदेव वाघ असे हत्या झालेल्या तर, मोनिका वाघ असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कर्जुलेपठार येथील रहिवासी अजित दादाभाऊ वाघ (वय २५) यांनी संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराजवळच मुरलीधर रामकृष्ण पडवळ यांचे कुटुंब राहते. घरात शौचालय नसल्याने वाघ कुटुंबीय अनेकदा मुरलीधर पडवळ यांच्या शेतात शौचालयासाठी जात असे. मंगळवारी (१० जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अजित वाघ यांची वहिनी, रुपाली ज्ञानदेव वाघ या शौचालयासाठी पडवळ यांच्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी विक्रम पडवळ तिथे आला आणि त्याने रुपाली यांना तुम्ही आमच्या शेतात शौचालयासाठी का जाता? असे म्हणत शिवीगाळ केली.

या घटनेनंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अजित वाघ, त्यांचे भाऊ ज्ञानदेव वाघ, वहिनी रुपाली वाघ आणि बहीण मोनिका दादाभाऊ वाघ हे विक्रम पडवळ यांच्या घरी त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले. त्यावेळी विक्रम पडवळ, मुरलीधर पडवळ आणि अलका पडवळ यांनी त्यांना शिवीगाळ केली. वाघ कुटुंबीयांनी आपली चूक झाली असून, आपण माफी मागतो असे सांगितले असता, मुरलीधर पडवळ यांनी जातीय शिवीगाळ केली. तसेच संतापलेल्या विक्रम पडवळ याने आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत घरातून धारदार चाकू घेऊन आला. अलका पडवळ हिने रुपाली वाघ यांचे हात धरले आणि विक्रम पडवळने त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसला. रुपाली यांना वाचवण्यासाठी त्यांची नणंद मोनिका दादाभाऊ वाघ धावली असता, विक्रम पडवळने तिच्याही कमरेच्या जवळ चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले.

तत्काळ वाघ यांनी रुपाली आणि मोनिका यांना मोटरसायकलवरून साकुर फाटा येथे नेले. तिथून खाजगी रुग्णवाहिकेतून त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात पाठवले. प्रवरा रुग्णालयात उपचारादरम्यान, बुधवारी (११ जून) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रुपाली ज्ञानदेव वाघ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर मोनिका वाघ यांच्यावर अद्याप प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी, अजित वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ, आणि अलका विक्रम पडवळ (सर्व रा. कर्जुलेपठार, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घारगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणी तीनही आरोपींना अटक करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना १६ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.