सांगली : लुटीचा बनाव करून वृध्द महिलेला जाळून मारण्याचा प्रकार नातजावयांनेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत दिली.

  याबाबत अधिक्षक श्री. दोशी यांनी सांगितले, आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील मालन मारूती जाधव (वय ८३) या एकट्या राहणार्‍या महिलेवर हल्ला करून तिला पेटवून देण्याचा प्रकार दि. ३० जून रोजी पहाटे अडीच वाजणेच्या सुमारास घडला होता. यावेळी तिच्याकडे असलेले १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ३० भार वजनाचे चांदीचे दागिनेही लंपास करण्यात आले होते. तिचा मुलगा विठ्ठल जाधव यांनी तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करून आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. बेशुद्धावस्थेत असल्याने तिचा जबाब पोलीसांना घेता आलेला नव्हता. त्यातच भाजून गंभीर जखमी झालेल्या वृध्द महिलेचा सांगली जिल्हा रूग्णालयात दि.३ जुलै रोजी मृत्यू झाला.

तिचा मृत्यूपूर्व जबाब नसल्याने पोलीसांना तपासासाठी नेमकी दिशा मिळत नव्हती. तरीही मुलाने दिलेल्या माहितीनुसार आणि ऐकिव माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, उप निरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने तपास करून नातजावई राजेश गायकवाड (रा. बलवडी ता. खानापूर) याला अटक केली. त्याने खूनाची कबुलीही दिली आहे.

या घटनेची पार्श्‍वभूमी सांगत  असताना अधिक्षक दोशी यांनी सांगितले, मृत महिला हिला तीन मुले व एक मुलगी, नातवंडे, नातसून असा मोठा परिवार आहे. मात्र, तिचे कुणाशी पटत नसल्याने ती एकटीच विभक्त राहून राहत होती. तिचे माहेर बलवडी असून तिची माहेरी असलेली जमिन तिने नातू प्रविण जाधव  याच्या  नावावर केली. तसेच शेटफळे येथेही तिची मालमत्ता आहे. तसेच ती गावातील लोकांना हातउसने पैसेही देत होती. यातून कुटुंबामध्ये तिच्याबद्दल असुया होती. गेल्या दीड महिन्यापासून नातूही तिच्यासोबत वास्तव्यास आला होता.

संपत्तीच्या कारणातून नातजावयांने मध्यरात्री तिच्या घरात घुसून तिच्या अंगावरील दागिने काढून घेउन तिला लाथाबुयययाने मारहाण करत अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवले होते. यात ती भाजून गंभीर जखमी होउन रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत झाली. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने संशयिताबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना स्थानिक अन्वेषण विभागाने ऐकीव माहितीवर खूनाचा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपीला अटक केली असल्याचे अधिक्षक श्री. दोशी यांनी सांगितले.