सांगली : सांगली महापालिकेने शंभर फुटी रस्ता अतिक्रमण मुयत केल्यानंतर आता मोर्चा कॉलेज कॉर्नरकडे वळवला  असून गुरूवारी  आपटा पोलीस चौकी ते कॉलेज कॉर्नर परिसरातील विक्रेत्यांची बांधीव अतिक्रमणे  जेसीबीच्या मदतीने उध्वस्त केली. यावेळी विरोध करण्याचा तोकडा प्रयत्न गाळेधारकांनी केला, मात्र, महापालिका अधिकार्‍यांनी या विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवली.

महापालिका क्षेत्रात वाहनासाठी खुला रस्ता मिळणे दुरापास्तच झाले होते. आयुक्त सत्यम गांधी यांनी गेल्या दोन दिवसापासून अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेत प्रत्यक्ष जागेवर जाउन या मोहिेमेचे नेतृत्व करत दोन स्वतंत्र पथके अतिक्रमण हटविण्यासाठी नियुयत केली आहेत. अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पथके तैनात करण्यात आली आहेत.

शहरातील शंभरफुटी रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम करून व्यवसाय थाटले होते. ही सर्व अतिक्रमणे, विनापरवाना उभारलेले जाहीरात फलक, कट्टे जेसीबीच्या मदतीने  उध्वस्त केल्यानंतर गुरूवारी सांगलीहून माधवनगरला जाणाार्‍या रस्त्यावरील अतिक्रमणाकडे मोर्चा वळवला.

आपटा पोलीस  चौकी ते कॉलेज कार्नर या मार्गावर इमारतीपुढे सोडण्यात आलेल्या वाहनतळाच्या जागेत पक्के बांधकाम करून या ठिकाणी विविध व्यवसाय सुरू करण्यात आले होते. यामुळे दुकानात येणार्‍या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच थांबत होती. अत्यंत रहदारी असलेला या  मार्गावर अतिक्रमणामुळे वारंवार वाहतुक कोंडी होत होती. आज या मार्गावरील नियमबाह्य बांधकामे जेसीबीच्या मदतीने उध्वस्त करण्यात आली. यावेळी काही गाळेधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा विरोध मोडून काढत अतिक्रमण दूर करण्यात आले.

शंभर फुटी रस्त्यावरील ३५० हून अधिक अतिक्रमणे जेसीबीच्या मदतीने काढण्यात आली. अतिक्रमण हटवत असताना अल्पसा विरोध मोडीत काढून ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमणात पत्र्याचे शेड, जीना, वाढीव बांधकाम हटविण्यात  आली असून ही  कारवाई यापुढेही सुरूच  राहील असा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला आहे.

महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अडथळे, पादचारी मार्गावरील अतिक्रमणे व व्यावसायिक अनधिकृत बांधकामे दूर करण्याच्या उद्देशाने मंगळवारी व बुधवारी असे सलग दोन दिवस १०० फुटी रोड परिसरात व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी आयुक्त गांधी जातीने उपस्थित होते. मोहीम प्रभावी व्हावी म्हणून दोन स्वतंत्र, प्रशिक्षित आणि सुसज्ज पथकांची रचना करण्यात आली होती.