दिगंबर शिंदे

सांगली :  विधानसभा निवडणुकीत चाराचे दोन आमदार झाल्याने भाजपच्या जिव्हारी लागले होते, ही मरगळ झटकून आता शतप्रतिशत भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन जिल्ह्यातील सर्व आठही जागा स्वबळावर जिंकण्याचा नारा पेठच्या कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने भाजप सांगली जिल्ह्यात आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट झाले. 

शिराळा येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. या पक्षांतराला चोख उत्तर देण्यासाठी पेठ येथे महाडिक बंधूंच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांचा मेळावा आयेाजित करण्यात आला होता.

 वाळवा मतदारसंघालगतच शिराळा मतदारसंघ, या दोन मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे भाजपचे प्रयत्न गेल्या निवडणुकीपासून सुरू आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश असल्याने एकेकाळी शेट्टी यांच्या रूपाने लोकसभा मतदारसंघही भाजपच्या पारडय़ात होता, मात्र शेट्टी यांनी साथ सोडताच हा मतदारसंघ धैर्यशील माने यांच्या रूपाने शिवसेनेने बळकावला. या दोन मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ताकद आहे.

वाळवा तर त्याचा गडच. या जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच अडकवून ठेवण्याची रणनीती सध्या भाजपची आहे. यामुळेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिराळय़ासोबत वाळवाही भाजपला हवा आहे, त्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी महाडिक समूहातील सम्राट महाडिक यांची बंडखोरी भाजपला त्रासदायक ठरली. महाडिक यांनी स्वबळावर घेतलेली ५० हजार मते जर भाजपच्या पारडय़ात पडली असती तर नाईकांच्या रूपाने या ठिकाणी कमळ फुलले असते. आ. पाटील यांनी या मेळाव्यात राज्यातील १४  मतदारसंघामध्ये तडजोडी केल्या असत्या तर या जागा भाजपच्या वाटय़ाला आल्या असत्या, अशी कबुलीच या मेळाव्यात दिली. नाईक यांनी भाजप नेत्यांनी मदत केली नसल्याचा आरोप करीत भाजपचा त्याग केला.

 जिल्हयात सांगली, मिरज हे दोन मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत. शिराळा आणि जत हे दोन मतदारसंघ भाजपने गमावले. यापैकी एक काँग्रेसने पटकावला, तर एक राष्ट्रवादीने कमावला. भाजपच्या दृष्टीने काँग्रेसही विरोधक असताना लक्ष्य मात्र राष्ट्रवादीलाच करण्याचे धोरण सध्या भाजपने ठेवले आहे. याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. भाजपचे मुख्य लक्ष्य इस्लामपूर असणार हे मात्र निश्चित. यासाठी जयंत पाटील विरोधकांना एकत्र करण्याची श्रीगणेशा पेठच्या मेळाव्यात साधली गेली. महाडिक गटाला ताकद देण्यामागे हेच मुख्य सूत्र आहे. इस्लामपूरमध्ये सध्या माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना मैदानात उतरविण्याची भाजपची तयारी आहे. यासाठी आ. सदाभाऊ खोत, महाडिक गट, नायकवडी गट आणि कामेरीचा पाटलांचा गट यांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

शिराळय़ात झालेल्या शेतकरी मेळाव्यात खा. पवार यांनी भाजपला प्रतिगामी ठरविण्याचा प्रयत्न आपल्या भाषणात केला. नाईकांची घरवापसी झाली असल्याचे सांगत असताना प्रतिगामी विचारांच्या पक्षापासून लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याची अप्रत्यक्ष भाजपवर टीका केली. या टीकेला भाजप मेळाव्यात दुर्लक्षित करीत राज्य सरकारवर टीका करीत महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभााराचा पंचनामा करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला.

पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध असलेले जनमत भाजपकडे वळले असून त्यांना सक्षम पर्याय देण्याचा पक्षाचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. एखाद्याला कोंडीत पकडून होत असलेला पक्ष विस्तार  पक्षाची ताकद वाढविण्यास पुरेसा ठरत नाही. याचे प्रत्यंतर आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसेल. 

– मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री, भाजप.