सांगली : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल सांगली, मिरज व ईश्वरपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाडू, पेढ्यांचे वाटप करत आनंद साजरा केला. ईश्वरपूरमध्ये भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी बिहारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत लाडू वाटप केले. बिहारमध्ये मिळालेला अभूतपूर्व विजय हा विकासाच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेला ठाम विश्वास असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त नेतृत्वाला मिळालेला हा जनादेश सशक्त भारताच्या दिशेने देशाची मजबूत पावले असल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले.

बिहार विजयाचा आनंद सांगलीतही साजरा करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारनंतरच कार्यकर्त्यांची गर्दी कार्यालयाच्या परिसरात वाढत गेली आणि निकाल स्पष्ट होताच विजयी घोषणा देत ढोल-ताशे, आतषबाजी करत आनंद साजरा करण्यात आला.

आमदार गाडगीळ म्हणाले, बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा विकासाच्याच बरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा विजय केवळ एनडीएचा नसून संपूर्ण देशाच्या प्रगतीचा विजय आहे. महिलांसाठी विविध योजनांनी बिहारात मोठा विश्वास निर्माण केला असून, या मतांच्या रुपाने त्याची पोचपावती मिळाली आहे.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, स्मिता भाटकर, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, विजय साळुंखे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वाती खाडे, सुमन सुरेश खाडे, मंजिरी गाडगीळ, सर्व माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, मंडल पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, मिरजेतील आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरही बिहारमधील विजयाचा आनंदोत्सव भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला. यावेळी आमदार खाडे यांच्यासह माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, सुरेश आवटी, माजी महापौर संगीता खोत, दिगंबर जाधव, संदीप आवटी, जयगोंड कोरे, अनिता हारगे, अनिल रसाळ, शीतल पाटोळे, नम्रता साठ्ये, प्राची फाटक आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.