सांगली : सांगली- बुधगाव मार्गावर एका वाहनचालकांने भरधाव मोटार चालवून वाटेत आलेल्या नऊ दुचाकीस्वारांना ठोकरल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर या मोटारीचा पाठलाग नागरिकांनी सुरू केला. पाठलाग चुकवण्याच्या प्रयत्नात मोटार रस्त्याकडेला उलटली.संतप्त नागरिकांनी मोटारीची तोडफोड केली.

तासगाव ते सांगली मार्गावरून एक मोटार चालक सुसाट वेगाने निघाला होता. साखर कारखाना परिसरात एका मुलाला त्याने ठोकरले. ही घटना घडल्यानंतर त्याचा पाठलाग काहींनी सुरू केला. जमावाच्या ताब्यात सापडायला नको म्हणून वेगात तो निघाला. यावेळी त्यांने आणखी आठ दुचाकीस्वारांना ठोकरले. हा प्रकार लक्षात येताच या मोटारीचा नागरिकांनी पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच वाहन चालक तरूणाने आपली मोटार कावजी खोतवाडी रस्त्यावर वळवली. या प्रयत्नात त्याची मोटार उलटून रस्त्याकडेला पडली.

दरम्यान, मोटार उलटी झाल्यानंतर पाठलाग करणारे नागरिकही त्या ठिकाणी आले. संतप्त नागरिक चालकाला बाहेर येण्याचे आवाहन करत होते. मात्र, त्यांने मोटारीचे दार न उघडता तसाच बसून राहिला. अखेर मोटारीवर दगडफेक सुरू होउन तोडफोड संतप्त नागरिकांनी सुरू केली. यावेळी तो बाहेर आला. त्याला जमावाने चोप दिला.

दरम्यान, या अपघााताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे  कर्मचारी  यांनी घटनास्थळी धाव घेत मोटार चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवत आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार ते पाच जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी तिघांना किरकोळ दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र, दोघांना गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर अद्याप रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.