सांगली : देशातील सर्वाधिक बक्षिसांची बैलगाडा शर्यत जिंकून येथील ‘ हेलिकॉप्टर बैज्या ‘ आणि ‘ ब्रेकफेल’ या बैलजोडीने सांगलीतील श्रीनाथ केसरीचे मैदान मारले. बैलगाडा शर्यतीच्या लाखो शौकीनांच्या साक्षीने या विजेत्या बैलजोडीच्या मालकाने फार्च्युनर मोटार जिंकली. बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ५०० एकर क्षेत्रावरील माळावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या मैदानाचे आयोजन केले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडा शर्यती पार पडल्या. ज्यामध्ये ‘हेलिकॉप्टर बैज्या ‘ आणि ‘ ब्रेकफेल’ या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत श्रीनाथ केसरीचा बहुमान आणि फॉर्च्यूनर गाडी जिंकली. आणखी एक गटात झालेल्या स्पर्धेमध्ये ‘ लखन ‘ आणि ‘ सर्जा’ या बैलजोडीने दुसरी फॉर्च्यूनर गाडी जिंकली.

हे शर्यतीचे मैदान संपल्यानंतर लगेचच चंद्रहार पाटील यांनी पुढच्या शर्यतीची घोषणा करत त्या स्पर्धेसाठी ‘ बीएमडब्ल्यू ‘ मोटारीची बक्षीस म्हणून घोषणा केली आहे. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील सगळ्यात मोठे मैदान सांगलीच्या तासगाव- बोरगाव जवळील कोंड्याचा माळ येथे पार पडले. यासाठी फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर, दीडशे बुलेट दुचाकींसाठी शेकडो बैलगाड्या धावल्या. या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुण्यासह उत्तर कर्नाटकातील लाखो बैलगाडी शौकिन उपस्थित होते.

अत्यंत थरारकपणे पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये ‘ हेलिकॉप्टर बैज्या ‘ आणि ‘ ब्रेकफेल’ या बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला. बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा हा मुंबईत मंत्रालयासमोर पार पडणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी ‘ बीएमडब्ल्यू ‘ मोटार बक्षीस म्हणून असणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.