सांगली : जिल्ह्यातील चांदोली धरणातील पाणीसाठा २४ टीएमसी झाला असून धरण ७० टक्के भरले आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सर्वाधिक पाऊस चांदोली धरण क्षेत्रात आणि चरण (ता. शिराळा) मंडळात झाला असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या २४ तासांत ५९ मिलीमीटर पाऊस झाला असून एक जूनपासून १ हजार ४९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामुळे धरणात २४.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शिराळा तालुक्यात चरण मंडळात गेल्या २४ तासांत ६६.५ मिलीमीटर पाऊस झाला असून जून महिन्यात या मंडळात ४३९.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

कृष्णा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने कृष्णा, वारणा व पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणीसाठा ८४.८३ टीएमसी म्हणजे धरण क्षमतेच्या ६९ टक्के झाला आहे. धरणातील पाण्याची आवक ९४ हजार ५१२ कयूसेक असून विसर्ग ९० हजार कयूसेकचा असल्याचे सांगलीच्या जलसंपदा कार्यालयातून सांगण्यात आले. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी १४.९ फूट असून इशारा पातळी ४० फूट आहे, अशी माहिती पूर नियंत्रण कक्षातून सोमवारी देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसाने वाहनधारक व शाळकरी मुलांची त्रेधा उडाली.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २.३, जत २.७, खानापूर-विटा ४.२, वाळवा-इस्लामपूर ६.५, तासगाव ४.४, शिराळा २७.२, आटपाडी १.७, कवठेमहांकाळ ७.६, पलूस ६.९ आणि कडेगाव ४.५ मिलीमीटर.