सांगली : काँग्रेस नेतृत्वाकडून होत असलेले दुर्लक्ष, वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अनियमित कर्जाचे शुक्लकाष्ठ आणि पुढील राजकीय भवितव्यामुळे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि वसंतदादांची नातसून जयश्री पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कॉग्रेसच्या विसंवादमुळे त्यांना पक्ष सोडावा लागल्याने पक्षाची अवस्था आणखी खोलात गेली आहे.
श्रीमती पाटील यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरू होती. अखेर भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनसुब्यांना एक प्रकारे शह देत महायुतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले.
सांगलीच्या राजकारणात मदन पाटील यांचा स्वतंत्र गट कार्यरत आहे. काँग्रेसअंतर्गत आतापर्यंत हा गट सक्रिय होता. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीला कट्टयावर बसवत या गटाने व खुद्द श्रीमती पाटील यांनी अपक्ष मैदानात उतरलेल्या विशाल पाटील यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली. सांगली विधानसभा मतदार संघात भाजपपेक्षा २० हजार मताधिक्य मिळवण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. यानंतर विधानसभेच्या उमेदवारीवर हक्कही सांगितला.
मात्र, पक्षाने त्यांना डावलून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. पक्षाच्या या उमेदवारीला विरोध करत श्रीमती पाटील यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली. भाजपच्या विजयासाठी काँग्रेसमध्ये फूट पडावी, श्रीमती पाटील यांची उमेदवारी राहावी यासाठी भाजपने अंतर्गत खेळी केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. या बंडखोरीमुळे श्रीमती पाटील यांना काँग्रेसने निलंबितही केले. यामुळे त्यांचा भाजप प्रवेश एकप्रकारे काँग्रेसचाच आत्मघात म्हणावा लागेल. निवडणुकीनंतर श्रीमती पाटील यांच्याशी संवाद साधण्यात काँग्रेस नेते कमी पडले. अथवा त्यांनी श्रीमती पाटील यांच्या नाराजीची दखलच घेतली नाही. हे वास्तव श्रीमती पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी कारणीभूत ठरले.
महापालिका क्षेत्रात मदन पाटील गटामध्ये मुस्लिम कार्यकर्तेही आहेत. भाजप प्रवेशाला त्यांचा विरोध होता. यासाठी त्यांनी पर्याय म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात जाण्याचा प्रयत्न होता. उपमुख्यमंत्री पवार यांनीही तुमच्या अडचणी सोडविण्याबरोबरच महापालिका क्षेत्रात पक्षाचे नेतृत्व देण्याचा शब्द दिला होता. अखेरच्या टप्प्यात चर्चा केल्याविना कोणताही निर्णय घाईने घेउ नका असाही निरोप दिला होता. अखेर भाजपची चाणक्य नीती कामी आली. श्रीमती पाटील यांनी भाजपमध्येच प्रवेश करावा यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनीही निर्णायक भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याबरोबरच या गटाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा भाजपने शब्द दिला आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या दोन जागा आणि वसंतदादा शेतकरी बँकेच्या चौकशीचा ससेमिरा थोपविण्याबरोबरच रिक्त असलेल्या सांगली- सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी हेही गाजर दाखविले असल्याचे सांगण्यात येत आहे.
वसंतदादा घराण्यात थोरली पाती आणि धाकटी पाती असे दोन प्रवाह अगोदरपासूनच कार्यरत होते. थोरल्या पातीचा वारसा रक्ताचा म्हणून खा. विशाल पाटील यांच्याकडे तर धाकटी पाती म्हणून मदन पाटील गटाकडे पाहिले जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या दोन्ही गटात एकोपा पाहण्यास मिळाला. यापुढील काळात आता ही दोन्ही घरे राजकीय वाटचाल कशी करतात हे महापालिका निवडनुकीवेळी स्पष्ट होईलच, पण या निर्णयाने आ. डॉ. विश्वजित कदम यांची मात्र सांगलीत राजकीय कोंडी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.