सांगली : सहकारामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा होउ घातलेला शिरकाव वेळीच रोखण्याची गरज आहे, अन्यथा सहकाराच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी आ.पाटील बोलत होते.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबरमध्ये समाप्त होत  असून सहकार विभागाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी संस्था प्रतिनिधींची नावे ठरावाच्या रूपाने मागणी झाली असून या ठरावात नाव समाविष्ट करण्यासाठी सहकारी संस्था संचालकांच्या पळवापळवीचे प्रकार काही ठिकाणी घडले. याचा संदर्भ घेत आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात यापुर्वी माणसे पळवून नेण्याची कधीच प्रथा नव्हती. खुलेपणाने निवडणुकीला सामोरे जाउन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवणे हेच आपल्या जिल्ह्यात घडत आले आहे. मात्र, आता काही ठिकाणी माणसे पळवून दहशतीने ठराव करण्याचे प्रकार जर घडू लागले तर सहकाराच्या दृष्टीने घातक ठरू शकते. सहकाराचे पावित्र्य यामुळे नष्ट होउन सामान्य माणसाला मदत करण्याच्या सहकाराच्या मूळ हेतूलाच धोका निर्माण होउ शकतो.यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच रोखण्याची गरज आहे. जिल्हा बँकेवर प्रशासक नियुयती करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी ठरला अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाउ खोत यांच्यावर केली.  

बँकेचे अध्यक्ष श्री. नाईक यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने चांगली प्रगती केली असून राज्यातील मोजक्या पाच बँकामध्ये सांगलीचा नंबर लागतो. शताब्दी वर्षात बॅकेेच्या ठेवी दहा हजार कोटीवर पोहचल्या, यामागे शेतकर्‍यांचा विश्‍वास महत्वाचा ठरला आहे. बँकेत चुकीचे काहीच घडलेले नाही. संचालक मंडळानेही विश्‍वासाने कामकाज केले. याला खासदार विशाल पाटील, आमदार विश्‍वजित कदम यांचीही चांगली साथ मिळाली असेही त्यांनी सांगितले.

सभासद विकास सोसायटींना चालू वर्षी १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे अध्यक्ष श्री. नाईक यांनी यावेळी जाहीर केले. तसेच शेतकरी अपघात विमा भरपाईचे दोन लाख रूपये बँकेच्या नफ्यातून देण्यात येणार आहेत. बँकेचा नेट एनपीए शून्य टयययावर असून ग्रॉस एनपीए साडेसहा टयययावरून ५ टक्क्यापर्यंत खाली आणण्याचे प्रयत्न आहेत. मार्चनंतर बँकेची स्थिती अधिक चांगली पाहण्यास मिळेल. नोकरभरती पारदर्शीपणे केली जाणार असून यात  शंकेला  कोणताही वाव राहणार नाही. बँकेत कोणतीही भानगडच केली नसल्याने भिती बाळगण्याचे काहीच कारण नसल्याचे ते म्हणाले.

सर्वसाधारण सभेच उपाध्यक्षा जयश्री पाटील, संचालक आमदार सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब व्हनमोरे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.