सांगली : गेल्या वर्षीची दुष्काळी स्थिती आणि यंदाची अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींसाठी जिल्हा बँकेने ‘लेक लाडकी कन्यादान योजना’ हाती घेतली असून या योजनेद्वारे विकास सोसायटी सभासदांच्या मुलीच्या लग्नावेळी दहा हजारांची विनापरतावा मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा बँकेेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.

जिल्हा बँकेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्यासह संचालक खासदार विशाल पाटील, मोहनराव कदम, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, प्रकाश जमदाडे, अमोल बाबर, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, चिमण डांगे आदी संचालकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ उपस्थित होते.

हेही वाचा >>>Amol Mitkari : “सर्व ठरवून केलंय का?” कोसळलेल्या पुतळ्याबाबत अमोल मिटकरींचा प्रश्न; नेमका आरोप काय?

आमदार नाईक म्हणाले, जिल्हा बँकेने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे हीच भूमिका कायम ठेवली आहे. कर्जदार शेतकरी संख्या २ लाख ९० हजार असून, सर्वांचा अपघाती विमा उतरविला आहे. सोसायटीतील कर्जदार शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नासाठी दहा हजार विनापरतावा मदत देण्याचा निर्णय बँकेने लेक लाडकी कन्यादान योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकेने दहा कोटींची तरतूद केली आहे. बँकेला मिळणाऱ्या नफ्यावर प्राप्तीकर भरावा लागतो. हा कर भरण्यापेक्षा शेतकऱ्याला मदत करावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विकास सोसायट्यांना देण्यात आलेले प्रिंटर खराब असून, नवीन देण्यात यावेत, अशी मागणी बाळासाहेब होनराव यांनी केली. काही सभासद नियमित कर्ज भरत असताना ८० टक्के शेतकरी थकित राहिल्यास कर्ज मिळत नसल्याने यावर तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वांगी सोसायटीचे प्रतिनिधी सुहेश मोहिते यांनी पीक कर्ज मर्यादा वाढीची मागणी केली.