शेरीनाल्याचे पंप गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याने सांगलीची गटारगंगा बिनदिक्कत कृष्णेच्या पात्रात मिसळत असल्याने सांगलीकरांसमोर आरोग्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. याबाबत नगरसेवक विष्णु माने व शेडजी मोहिते यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून या प्रश्नाची तातडीने सोडवणूक करून सांगलीकरांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबविण्याची विनंती केली आहे.
शेरी नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी धुळगाव येथील शेतीला देण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. या योजनेसाठी महापालिकेने सुमारे ३० कोटींचा खर्च केला असून ही योजना आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. योजनेची प्रायोगिक तत्त्वावर चाचणीही घेण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर पंपामधून सांडपाणी धुळगाव येथील शेतीला देण्यात येत होते. मात्र ३ महिन्यापूर्वी एक पंप बंद झाल्याने योजनेचे अन्य पंप बंद पडले आहेत. पंपगृहासाठी उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड गंजल्याने त्यातून गळती होउन हे पंप जळाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
मात्र पंप बंद पडल्यानंतर याबाबत कोणतीही हालचाल महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली नाही. पंप बंद राहिल्याने हे पाणी गटारीच्या माध्यमातून पुन्हा कृष्णा नदीत मिसळत आहे. या शेरीनाल्याच्या नदीला मिळणाऱ्या ठिकाणापासून काही अंतरावर सांगलीकरांसाठी पाणी उचलण्याचे जॅकवेल असून शेरी नाल्याचे पाणी थेट नदीत मिसळत असल्याने तेच पाणी पुन्हा सांगलीकरांना नळाद्बारे पुरविण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवक माने यांनी केला.
दरम्यान, याबाबत काल अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यानंतर ही बाब समोर आली. याबाबत आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेउन उपाययोजना तत्काळ करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचीही आग्रही मागणी करण्यात आली.