सांगली : निवडणुकीवेळी वाहनांची तपासणी करत असताना राष्ट्रीय महामार्गावर एका वाहनातून ४० लाखाची १५ किलो चांदीची वाहतूक उघडकीस आली असून पोलीसांनी चांदी जप्त केली आहे, तर कडेगाव तालुक्यात मतदारांना प्रलोभन म्हणून साडी वाटप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महसूल व पोलिस विभागामार्फत महामार्गावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबी परिसरात एका मोटारीची तपासणी करताना सुमारे ४० लाखाची १५ किलो चांदी मिळून आली. हुपरी (जि. कोल्हापूर) येथून चांदी घेऊन आलेल्या संबंधित व्यक्तीस चांदी व मोटारीसह ताब्यात घेण्यात आले. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. ही चांदी हुपरी येथून सोलापूरकडे व्यापारासाठी नेली जात असल्याचे संबंधिताने सांगितले, मात्र याबाबत जीएसटी विभागामार्फत खरेदीची बिले व इतर कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, वडियेरायबाग (ता. कडेगाव) या ठिकाणी मतदारांनी प्रलोभन म्हणून साडी वाटप करण्याचा उघडकीस आला. वडियेरायबाग गावात मतदारांना साड्या वाटप सुरू असल्याची माहिती भरारी पथकाला गटविकास अधिकारी प्रशांत राउत यांनी दिली. यानुसार भरारी पथकाने जाउन पाहिले असता वडियेरायबाग गावात जाणार्या रस्त्यावर इर्टिगा मोटार (एमएच ११ सीजी १९७५) मधून साडी वाटप होत असल्याचे आढळले.
स्थानिक लोकांच्याकडे भरारी पथकाने चौकशी केली असता हे साडीवाटप भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, भरारी पथक घटनास्थळी येताच तीन कार्यकर्त्यांनी मोटार व साडीचे गठ्ठे जागेवरच सोडून पळ काढला. या प्रकरणी पथक प्रमुख संजय होनमाने यांनी चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच आटपाडी पोलीेस ठाण्यात प्रचार का करतोस या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची तक्रार संकेत अनुसे यांनी दिली आहे.

