सांगली : मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सोमवारी सांगली, मिरजेसह जिल्ह्यात सर्वत्र श्रींच्या मूर्तीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात सहा हजाराहून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापना केली असून रात्री उशिरापर्यंत मंडळांच्या स्वागत मिरवणुका बेेजो, झांज, ढोल पथक, लेझीमच्या निनादात सुरू होत्या.जिल्हा प्रशासनाने डीजेला  परवानगी नाकरली असतानाही दोन मंडळांनी काल रात्री स्वागत मिरवणुकीत डीेजेचा वापर केल्या प्रकरणी पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

आज सकाळी घरगुती गणेश मुर्तीचे स्वागत आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात अनेक कुटुंबांची धांदल उडाली होती. सकाळी साडेअकरा पर्यंत मुहुर्त नसल्याच्या कारणाने अनेक कुटुंबांनी यानंतर गणेशमूर्ती घरी आणल्या, तर काहींच्या घरात कालच गणरायाचे विधीवत स्वागत करण्यात आले.

गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी सांगलीत पुष्पराज चौक, विश्रामबाग गणेश मंदिरासह अनेक ठिकाणी विक्री केंद्रे उभारण्यात आली होती. गणेश मुर्तीचे स्वागत करण्याबरोबरच सजावटीसाठी फुले, तोरण, विद्युतमाळा विक्रीसाठी खास दुकाने रस्त्यावर उभारण्यात आली होती. याशिवाय गणेशमुर्ती समोर ठेवण्यासाठी फळे, नारळ, दुर्वा, आघाडा, हार यांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी सांगलीतील मारूती रोड, हरभट रोड, मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात झाली होती. गर्दी झाल्याने अनेक मार्गावर वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती.  

सांगली संस्थानच्या गणेशाचे पूजन गणेश दुर्गातील दरबार हॉलमध्ये करण्यात आले. आरतीसाठी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राणीसाहेब राजलक्ष्मीसाहेब पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन, गणपती पंचायतनचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आदींसह मानकरी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगली संस्थानच्यावतीने पाच दिवस  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिरज संस्थानच्यावतीने श्रींच्या मूर्तीची स्वागत मिरवणुक पालखीतून काढण्यात आली. यावेळी पटवर्धन घराण्यातील युवराज माधवराजे पटवर्धन, आमदार सुधीर गाडगीळ, आ. इद्रिस नायकवडी सहभागी झाले होते.  

दरम्यान, सार्वजनिक मंडळांच्या स्वागत मिरवणुका सायंकाळपासून सुरू झाल्या असून यंदा उंच आणि कलात्मक मूर्तीवर मंडळांचा विशेष भर असल्याचे दिसून आले. स्वागत मिरवणुकीत डीजेच्या ध्वनी वर्धकांचा वापर अनेक मंडळांनी टाळला असून याऐवजी बेंजो, बॅण्ड पथक, लेझीम पथक, झांज व ढोल पथक यांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. फटाक्याची मनसोक्त आताषबाजी करत मंडळांच्या स्वागत मिरवणुका काढण्यात आल्या.

गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला काही मंडळांनी स्वागत मिरवणुका काढल्या होत्या. दुधगाव आणि तुंग या गावी सार्वजिनक गणेशाच्या स्वागत मिरवणुकीत डीजेचा वापर करून ध्वनीप्रदुषण केल्या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष, डीजे चालक, वाहन चालक अशा १४ जणाविरूध्द सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगितले.