सांगली : चला चहा घेउ या…. असे म्हणण्यासारखी आता परिस्थितीच राहिली नाही. चहाने आदरातिथ्य करणे सांगलीत बंद झाले आहे. आखातातील युध्दस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईने रस्त्यावरील हातगाड्यावरील चहा बंद झाला आहे. तर मोठ्या हॉटैलात आता गॅस शेगडीच्या ऐवजी कोळशाच्या शेगडीचा वापर करून वेळ मारून नेली जात आहे. हॉटेलममधील डोसा, आंबोळी, वडा या जागा आता इडलीने घेतली आहे.
गॅस टंचाईच्या झळा ९० टक्के हातगाडी चालकांना बसला असून बंदिस्त व मोठ्या उपहारगृहामध्ये नाष्ट्याचे पदार्थ तयार करण्यासाठी गॅस शेगडी ऐवजी कोळशाच्या शेगडीचा वापर करण्यात येत असल्याने नटराज अॅनेक्स हॉटेलचे व्यवस्थापक कीर्तीकुमार शेट्टी यांनी गुरूवारी सांगितले. सांगलीतील खाउ गल्लीमध्ये दिवसभर गरम तव्यावर ग्राहकांना ताजी आंबोळी, उत्ताप्पा, डोसा हे दाक्षिणात्य पदार्थ देणारे गाडेही आता गॅस मिळत नसल्याने बंद झाले आहेत.
तसेच गरीबाची पोटपूजा करणारे दहा रूपयांना एक मिळणारा वडा-पावची जागा इडलीने घेतली आहे. एकावेळी अनेक इडली करून ती विक्री करता येत असल्याने हा पर्याय स्वीकारला जात आहे. तरूणाईची गर्दी असलेली चायनीज नाष्टा सेंटरही आता बंद झाली आहेत. चहा ऐवजी हॉटेलमध्ये ताक घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे.
घरगुती गॅससाठी गॅस वितरण करणार्या कंपनी कार्यालयाजवळ रांगा आजही लागल्या आहेत. नोंदणी करत असताना अडचणी निर्माण होत असल्याने गॅस ग्राहक नोंदणीसाठी कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. प्रशासनाकडून गॅस टंचाई नसल्याचे सांगितले जात असले तरी ग्राहक यावर विश्वास ठेवण्याऐवजी गॅस नोंदणी करून सिलेंडर वाट्याला कसा येईल यासाठी जास्त प्रयत्नशील दिसत आहेत.
सांगली शहरात केवळ एकाच पंपावरती एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे या पंपावरत गॅस भरण्यासाठी रिक्षाची मोठी रांग लागली आहे. दुसरीकडे या आठ दिवसात एलपीजी गॅसचे दरही जवळपास २५ रुपयांनी वाढले आहेत. यामुळे रिक्षाचालकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. महापालिकका क्षेत्रात सुमारे तीन हजार रिक्षा या सीएनजी गॅसवर चालतात. मात्र, सध्या गॅसचा पुरवठा कमी होत असल्याने रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या गॅसचे दर प्रतिलिटर ८० ते ८५ रुपये असून या पंपावरचा गॅस पुरवठा खंडित झाल्यास रिक्षा चालकाचे हाल होणार आहेत. गॅस पुरवठा सुधारला नाही तर अनेक रिक्षा रस्त्यावरून गायब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून गॅस वितरकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात युध्द परिस्थितीमुळे व्यावसायीक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. शाळा, हॉस्पिटल आणि अत्यावश्यक सेवा असणार्या औद्योगिक ठिकाणी तेवढा व्यावसायिक गॅस देण्यात येत आहे.
