सांगली : एचआयव्ही संसर्गित व्यक्तिंच्या वैवाहिक आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यातून ९ विवाह संपन्न झाले. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तिंना समाजात सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगता यावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून एचआयव्ही सह जगणाऱ्या विवाह इच्छुक व्यक्तींसाठी वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.

याबाबत जिल्हाधिकारी श्री. काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील जवळपास ११ हजार एचआयव्ही बाधित नागरिकांना मोफत एआरटी औषधोपचार दिले जात आहेत. उपचारांबरोबरच अन्य विविध शासकीय योजनांच्या लाभाद्वारे त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, सहजीवनातून त्यांचे भावविश्व समजून घेण्यासाठी एच.आय.व्ही. संसर्गित लोकांचे विवाह करून देणे सुध्दा एक सामाजिक गरज आहे. अशा लोकांचे विवाह करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व त्यांच्या पथकाने एचआयव्ही सह जगणाऱ्या विवाह इच्छुक व्यक्तिंसाठी वधु-वर परिचय मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये स्थानिकांसह इतर जिल्ह्यातील व परराज्यातील व्यक्तिंनीही सहभाग नोंदविला होता. एकूण २४५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी नऊ जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, समाजातील इतर व्यक्तिंप्रमाणेच एचआयव्ही संसर्गित नागरिकांनाही सुखासमाधानाने आयुष्य जगण्याचा आणि वैवाहिक आयुष्याचा पूर्ण अधिकार आहे. एचआयव्हीसह जगणाऱ्यांचा विवाह ही जशी सामाजिक गरज आहे, तसेच त्याला वैज्ञानिक आधारसुध्दा आहे. नियमित औषधोपचार घेत असल्यास रक्तामधील विषाणू हा एक हजार पेक्षा कमी असेल तर जन्माला येणारे मूल हे ९९ टक्के एचआयव्हीपासून मुक्त राहते. त्यामुळे या लोकांचे आयुष्य हे अधिक आशादायी बनून सदृढ व निरोगी समाज निर्माण होण्यास मदत होते.