सांगली : जिल्ह्यातील ५२ केंद्रावर आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली असून नक्कलमुक्त परीक्षेसाठी यंदा प्रथमच सर्व केंद्रावरील परीक्षा कक्षावर जिल्हा परिषदेतून निरीक्षण ठेवण्यात आले. याचे ध्वनीचित्रमुद्रण कायम राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ५२ परीक्षा केंद्रावर आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेसााठी ३२ हजार ५०४ परीक्षार्थी असून यासाठी १३०७ वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वर्गातील पर्यवेक्षकाकडे एक मोबाईल देण्यात आला असून या मोबाईलवर झूम लिंकद्वारे संपूर्ण वर्गावर नियंत्रण ठेवण्यात येत होते. यावरील चित्रीकरण जिल्हा परिषदेत पाहून त्यांचे परिक्षण करून गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत असल्याचे श्री. नरवाडे यांनी सांगितले. ही व्यवस्था बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी कायम ठेवण्यात येणार असून याद्वारे परीक्षेतील गेैरप्रकार रोखून परीक्षा पध्दती नक्कल मुक्त आणि पारदर्शीपणे पार पाडण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर होता. परीक्षार्थींना परीक्षा केंद्राच्या प्रवेशदारावरच परीक्षा विभागातील शिक्षकांकडून तपासणी करून परीक्षा कक्षात सोडण्यात येत होते. तसेच परीक्षा कक्षामध्ये पर्यवेक्षक नक्कलमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी तैनात असतानाच परीक्षार्थीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.
कॉपीमुक्त परीक्षा हे धोरण परीक्षा मंडळाकडून अवलंबले जात आहे. यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर प्रवेश करत असतानाच त्याची पडताळणी करण्यात येत असून आक्षेपार्ह मजकूर, अथवा अन्य काही साहित्य सोबत ठेवले जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षण करणार्या शिक्षकांनाही जवळ भ्रमणध्वनी बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
आज पालकांना परीक्षेसाठी सोडण्याकरित परीक्षा केंद्रावर पालकांचीही गर्दी झाली होती. मुलांना परीक्षेच्या शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्र संचालकाकडून शुभेच्छा संदेश देण्यात येत होता. तसेच परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागानेही दक्षता घेतली असून कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची यंत्रणा उपलब्ध नाही अशा ठिकाणी बैठे भरारी पथक तैनात करण्यात आले असून गैर प्रकार रोखण्यासाठी पेपरचा कालावधी संपेपर्यंत भरारी पथक केंद्रावर ठाण मांडून राहणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी सांगितले.
