तलावात बुडत असलेल्या भावाला वाचविण्यासाठी गेलेल्या मुलांसह दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना सनमडी (ता. जत) येथे घडली. हर्षद संजय कांबळे (वय १६) व जगदीश वसंत मोरे ( वय १५) अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, जत तालुक्यातल्या सनमडी येथे साठवण तलावामध्ये बुडून दोघा शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघेही आत्तेभाऊ होते. हर्षद याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, तर जगदीश हा नववी इयत्तेत शिक्षण घेत होता.
मृत हर्षद याच्या वडिलांच्या सनमडीच्या साठवण तलावातील मत्स्य ठेका असल्याने आत्तेभाऊ जगदीशसोबत हर्षद साठवण तलवावर गेला होता. यावेळी तोल जाऊन जगदीश हा साठवण तलावामध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी हर्षदने पाण्यात उडी घेतली, मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
