सांगली : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला कडेगावचा गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत शांततेत पार पडला. जोरदार वारे, पाऊस यामुळे यावेळच्या भेटीला विलंब झाला असला तरी उत्साह मात्र नेहमीचाच होता.कडेगावच्या ताबूत भेटीची परंपरा गेल्या दीडशे वर्षांची आहे. यंदा जोरदार वाऱ्यामुळे उंच ताबूत भेटीचा सोहळा पारंपरिक देशमुख चौकात न होता, पाटील वाड्यासमोर पार पडला. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘दुला दुला’ व ‘मौला अली झिंदाबाद’ असा एकच जयघोष केला. येथे मोहरमनिमित्त सोहोली, निमसोड व शिवाजीनगर येथील मानकऱ्यांनी आज सकाळी पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात तांबुतांची पूजा केली. त्यानंतर दुपारी बारा वाजता सातभाईंचा मानाचा ताबूत उचलण्यात आला. त्यानंतर ताबूत भेटीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला.

तर साडेबारा वाजता बागवान यांचा ताबूत उचलण्यात आला. या दोन्ही ताबूतांची पटेल चौकात दुपारी एक वाजता भेट झाली. हे ताबूत मिरवणुकीने मुख्य भेटीच्या ठिकाणी निघाले असता वाटेत शेटे, आत्तार, देशपांडे, हकीम, तांबोळी यांचेही ताबूत मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर येथील सुरेशबाबा देशमुख चौकात शेख, इनामदार तसेच सुतार यांचे उंच ताबूत व मजूदमाता ताबूतही दाखल झाले. देशमुख, शिंदे, शेटे, देशपांडे, कुलकर्णी आदी मानकऱ्यांनी पंजे भेटीच्या ठिकाणी आणले. यावेळी बुधवार पेठ मेल व शुक्रवार पेठ मेल यांच्यात नाथपंथीय गीतांचे सामने झाले. तसेच राष्ट्रीय एकात्मतेची गीते गायली गेली. मानकऱ्यांनी ताबुतांचे पूजन केल्यानंतर दुपारी दोन वाजता राज्यासह कर्नाटक सीमाभागातून आलेल्या सुमारे लाखांवर भाविकांच्या अलोट उत्साहात आणि ‘दुला दुला’ व ‘मौला अली झिंदाबाद’ च्या जयघोषात येथे मोहरमनिमित्त मानाप्रमाणे सर्व ताबुतांच्या भेटींचा सोहळा झाला. बागवान यांचा ताबूत जागेवर पोहोचल्यावर या सोहळ्याची सांगता झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जितेश कदम, विश्वतेज देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी पवन म्हेत्रे आदी मान्यवर व नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव, भाविक व नागरिक उपस्थित होते.