सांगली : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाउस पडत असल्याने सांगलीतील बंधारा ओसंडून वाहत आहे. मात्र, पश्चिम घाटात पावसाची दमदार हजेरी असली तरी जिल्ह्याच्या पूर्व भागात अपेक्षित पाउस नसल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत.तथापि, रविवारी खानापूर व जत पूर्व भागात दमदार वळीव स्वरूपाचा पाउस झाल्याने पेरण्यासाठी शेतकरी वर्गाची धांदल उडाली आहे.
सांगली जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडत नसला तरी कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणार्या संततधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळी मध्ये काहीशी वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणार्या संततधार पाऊसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कृष्णा नदीवरील सांगलीवाडी बंधारा प्रवाहित झाला आहे . काही दिवसापूर्वी कृष्णेचे पाणी पातळी खालावल्याने नदीपात्र कोरडे पडू लागलं होते. मात्र पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळी काहीशी वाढताना दिसून येत आहे. दुसरीकडे ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकर्यांनी पेरणी करायला सुरुवात केली आहे मात्र ज्या भागांमध्ये अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाहीत त्या ठिकाणी अद्याप पेरण्या रखडल्या आहेत.
पश्चिम घाटात पाउस सुरू असल्याने कोयना व चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात अल्प वृध्दी झाली आहे. गेल्या तीन दिवसातील पावसाने चांदोली धरणात अर्धा टीएमसी पाणी साठा वाढला असून दि. ३० जून रोजी ११.४५ टीएमसी असलेला पाणी साठा शुक्रवारी ११.९७ टीएमसी झाला आहे. तर कोयना धरणात दि.३० जून रोजी १४.४८ टीएमसी असलेला पाणी साठा आज १६.०३ टीएमसी झाल्याचे जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. कोयना येथे ५३, महाबळेश्वर येथे १५८, तर नवजा येथे १०५ मिलीमीटर पाउस गेल्या २४ तासात झाला, तसेच चांदोली धरणाच्या ठिकाणी ४६ मिलीमीटर पाउस झाला असल्याचे पूरनियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्वाधिक २६.९ मिलीमीटर पावसाची नोंद शिराळा तालुकयात झाली. अन्य तालुकयात झालेला पाउस असा वाळवा १०.२, मिरज ३.९, खानापूर २.४, तासगाव १.२, पलूस ३.७, कडेेगाव ४.५ मिलीमीटर अन्य तालुकयात सरासरी १ मिलीमीटरहून कमी पाउस नोंदला गेला.
दरम्यान, आज सकाळी नउ वाजेपर्यंत पश्चिम भागात मध्यम स्वरूपाचा तर मिरज, सांगली परिसरात हलक्या स्वरूपाचा पाउस पडला. दुपारपासून मात्र थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे पावसाबाबत आज आशादायक स्थिती निर्माण झाली आहे.
