सांगली : सर्वसाधारण ग्रामसभेच्या ‘पुरुषी’ रगाड्यात हरवून जाणार्‍या महिलांच्या विषयांना महिला ग्रामसभेतून वाचा फुटते. मुख्य ग्रामसभेपूर्वी अशी महिला ग्रामसभा भरवण्याचे प्रमाण सांगली जिल्ह्यात सर्वाधिक आहे. अशाच एका महिला ग्रामसभेतून रक्ताल्पता वा पंडुरोगाची (ॲनिमिया) समस्या पुढे आली आणि मग ‘पहिला घास गृहलक्ष्मीचा’ योजनेपासून महिलांच्या नियमित तपासणी शिबिरांना सुरुवात झाली.

गावातील महिलांच्या विषयावर चर्चा व्हावी, यासाठी मुख्य ग्रामसभेच्या आधी महिला ग्रामसभा घ्यावी, असा नियम आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होतेच असे नाही किंवा झाली तरी ती औपचारिकताच. पण काही जिल्ह्यांनी हा नियम कागदापुरता मर्यादित न ठेवता त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याचे दिसून आले. यात सांगली जिल्ह्याने लक्षवेधक कामगिरी केली आहे. नियमितपणे भरवण्यात येणार्‍या अशा सभांमधून महिलांशी संबंधित अनेक विषय, समस्या पुढे येतात आणि त्याचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला पावले उचलता येतात. महिलांमधील रक्ताची कमतरता ही अशाच एका ग्रामसभेतून समोर आलेली समस्या.

ग्रामीण भागातील महिला ही प्रामुख्याने रक्ताल्पतेने ग्रस्त असल्याचे दिसून आले. घरी मुबलक प्रमाणात अन्न मिळत असतानाही महिलांमध्ये रक्ताल्पता  म्हणजेच ॲनिमिया का आढळतो याचा विचार करत असताना वेळी-अवेळी जेवण, कुटुंबातील सगळ्यांची जेवण झाल्यानंतर जेवण करणे, उरलेसुरले खाऊन वेळ मारून नेणे ही कारणे महिलांच्या ग्रामसभेतील चर्चेतून पुढे आली. त्यावर मात करण्यासाठी काही गावांनी ‘पहिला घास गृहलक्ष्मीचा’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. घरातील अन्य कोणीही जेवण्याआधी महिलेने जेवण करावे, अशी यामागची भूमिका होती. त्याला काही गावांत चांगला प्रतिसाद मिळत आहे.  जिल्ह्यातील ५० टक्के गावात महिला सरपंच असल्याने ही संकल्पना केवळ कागदोपत्री न राहता चळवळ बनावी असे प्रयत्न जिल्हा परिषदेचे असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य विभागानेही अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडून ग्रामीण आरोग्य केंद्रात महिलांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम सुरू केली. यामध्ये ५५ ते ६० टक्के महिलांना रक्ताल्पता म्हणजेच ॲनिमिया आजार असल्याचे आढळून आले. त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण ७ ते १४ टक्के असल्याचे आढळले. त्यामुळे या महिलांच्या आरोग्यावर ‘पहिला घास गृहलक्ष्मीचा’ संकल्पनेद्वारे लक्ष केेंद्रित करण्यात आले.

औद्योगिक प्रगतीमध्ये सहकारी, खासगी साखर कारखान्याच्या माध्यमातून उद्यमशीलता दिसत असली तरी जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे कोणतेही मोठे प्रकल्प नाहीत. शेतीमध्ये ऊस पिकांनी पश्चिम भाग सधन झाला असून द्राक्ष, डाळिंब पिकांनी दुष्काळी भागाला गेल्या काही वर्षात प्रगतीच्या वाटेवर आणले आहे.

सिंचन योजनांना गती

कायम दुष्काळी असा शिक्का असलेल्या जत तालुक्यातील पूर्व भागातील ६४ गावे सिंचनापासून वंचित आहेत. या गावासाठी म्हैसाळ सिंचन योजना टप्पा दोनचे काम सुरू करण्यात आले असून या कामातील दीड किलोमीटर अंतराचा बोगदा खुदाई पूर्ण करण्यात आली आहे. ९० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील हंगामात दुष्काळी भागात कृष्णा-वारणेचे पाणी खळाळू लागेल.  ताकारी, टेंभू, म्हैसाळ आणि आरफळ योजनेतून पाण्याची उपलब्धता झाल्याने पूर्व भागातील माळरानेही आता हिरव्या पिकांने डोलू लागली आहेत.

महिलांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने चिडचिडेपणा, कमी श्रमात दमणूक, डोकेदुखी यांसारखे आढळत असल्याची चर्चा ग्रामसभेत झाली. यानंतर आरोग्य सुधारण्यासाठी महिलेने वेळेवर जेवण्याचा निर्णय घेण्यात आला.- संध्याराणी मंडले, सरपंच मांजर्डे, ता. तासगाव.

जिल्ह्यातील १८ वर्षावरील ३  लाख ४४ हजार ४५० महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे २ लाख ३९ हजार ८०९ महिलांमध्ये हे प्रमाण सुधारले आहे.- डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा  परिषद, सांगली

मुख्य प्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

सहप्रस्तुती : संजय काकडे ग्रुप

सहप्रायोजक : व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज ,लिमिटेड, कमला ग्रुप

पॉवर्ड बाय : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, महानिर्मिती

नॉलेज पार्टनर :  गोखले इ्स्टिटट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे</p>

डेटा पार्टनर : अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन