scorecardresearch

सांगली हत्याकांड : गुप्तधनासाठी घेतलेले ८० लाख रुपये बुडवण्याचा हेतू; चहातून विषारी औषध देऊन नऊजणांची हत्या

जिल्हा हादरवून सोडणारे म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड काळय़ा चहातून विषारी औषध देऊन घडविण्यात आले असून १९ जूनच्या रात्री दहा ते पहाटे पाच या सात तासांत रात्रीचा मृत्यूचा खेळ सुरू होता, अशी प्राथमिक माहिती  पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

death
(प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : जिल्हा हादरवून सोडणारे म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड काळय़ा चहातून विषारी औषध देऊन घडविण्यात आले असून १९ जूनच्या रात्री दहा ते पहाटे पाच या सात तासांत रात्रीचा मृत्यूचा खेळ सुरू होता, अशी प्राथमिक माहिती  पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. गुप्तधन काढून देण्यासाठी वनमोरे कुटुंबाकडून उकळलेले ८० लाख रुपये द्यावे लागू नयेत या हेतूनेच हे हत्याकांड पूर्वनियोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. म्हैसाळ हत्याकांडप्रकरणी सोलापूरचा मांत्रिक आब्बास महमंदअली बागवान हाच मुख्य सूत्रधार असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असून धीरज सुरवसे हा मोटारचालक आहे. 

दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी अटक करण्यात आलेल्या धीरज सुरवसे याला न्यायालयाने दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले. तर मुख्य संशयित मांत्रिक बागवान याला अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने उपचारासाठी मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  रुग्णालयात दाखल केले आहे. उपचारानंतर त्याला न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी न्यायालयाकडे ताबा मागण्यात येणार आहे.

घडले काय?

  • १९ जून रोजी गावातल्या वडिलोपार्जित घरात असलेले गुप्तधन काढण्यासाठी महापूजा करण्याचा घाट मांत्रिकाने घातला. यासाठी कोल्हापूर येथे बँकेत नोकरी करणारी मुलगी अर्चना वनमोरे आणि आई आक्काताई वनमोरे यांना बोलावून घेण्यात आले. रात्री दहानंतर काळय़ा चहामध्ये विषारी औषध घालून अमृत आहे असे सांगत प्रथम पोपट वनमोरे, पत्नी संगीता व मुलगी अर्चना यांना देण्यात आले. त्यानंतर मुलगा शुभम याला घेऊन डॉ. माणिक वनमोरे याच्या घरी जाऊन शुभमसह माणिक, पत्नी रेखा, आई आयकाताई, मुलगी प्रतिमा आणि मुलगा आदिनाथ या सहा जणांना विषयुक्त काळा चहा देण्यात आला. हा सर्व प्रकार केल्यानंतर मांत्रिकाने चालकासह मोटारीतून पोबारा केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.
  • पाहा व्हिडीओ –
  • गेली चार वर्षांपासून या मांत्रिकाचे वनमोरे कुटुंबाकडे येणे-जाणे होते. गुप्तधन काढण्यासाठी त्याने सुमारे ८० लाख रुपये उकळले असून ही रक्कम वनमोरे बंधूंनी हातउसने, पतसंस्थेतील कर्ज व  खासगी सावकाराकडून घेतली होती. गुप्तधन नाहीतर दिलेले पैसे परत कर म्हणून वनमोरे कुटुंबाने मांत्रिकाकडे तगादा लावला होता. यातूनच हे पैसे बुडवण्यासाठी या मांत्रिकाने नियोजन करून हत्याकांड घडवून आणले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sangli massacre intention secret money killed poisonous drug tea ysh

ताज्या बातम्या