सांगली : विश्रामबाग परिसरात खून, खूनाचे प्रयत्न, चोर्‍या-मार्‍या करणार्‍या ओन्ली आज्या टोळीतील सात तरुणांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सातजणांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी शुक्रवारी मंजुरी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.

विश्रामबाग परिसरात दुचाकीवरून जात असताना अश्‍विनकुमार या तरुणावर चाकूने वार करत त्याचा खून केला होता. या प्रकरणी तपास सुरू असताना विश्रामबाग परिसरात सातत्याने दहशत माजवून गुन्हेगारी कृत्ये करणारी टोळी असल्याचे निष्पन्न झाले. मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यामध्ये ओन्ली आज्या टोळीचा प्रमुख अजय उर्फ अजित खोत (वय २३), विकी पवार (वय २३), कुणाल पवार (वय २२ सर्व रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, वडर कॉलनी), गणेश वळे (वय ३६ रा. गोकुळनगर), सुजित चंदनशिवे (वय २९) आणि अर्जुन पवार या सात जणांचा समावेश आहे.

हेही वाचा – सांगली : जिल्हा बॅंकेत ५० कोटींच्या नुकसानप्रकरणी आजी, माजी संचालकासह ४१ जणांना नोटीसा

हेही वाचा – सातारा : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंद बाजारात बोकड व बकरीची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री, कोट्यावधी रुपयांची विक्रमी उलाढाल

या टोळीने टोळीचे वर्चस्व टिकविण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी व इतर लाभ मिळवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत व हिंसाचाराचा उपयोग करुन बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, घातक हत्यारे घेवून नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी, खंडणी मागणे, किरकोळ कारणावरुन खून करणे, खून करण्याचा प्रयत्न करणे, चोरी करणे, जबरी चोरी करणे, टोळीची दहशत रहावी म्हणून गंभीर दुखापतीचे गुन्हे करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, बंद घरे फोडून, उचकटून चोर्‍या करणे तसेच बेकायदेशीर बिगर परवाना शस्त्रे बाळगणे आदी गुन्हेगारी कारवाया गेल्या दहा वर्षांत केल्या आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.