सांगली : नियोजन समितीच्या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत मान्य केले.
सोमवारी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी महापालिका क्षेत्रात प्रशासनाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत आ. पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला. महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही, त्यांना ठिकाणे निश्चित केली नाहीत, सोयीसुविधा उपलब्ध केल्या नाहीत, तरीही प्रशासनाकडून जबरदस्तीने नुकसान करत अतिक्रमण काढण्यात येत आहेत असे आ. पडळकर म्हणताच, आयुक्त गांधी यांनी अतिक्रमण असलेल्यांना नोटिसा देऊन रितसर अतिक्रमण काढण्यात येत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी आ. पडळकर यांनी गरिबांची अतिक्रमणे का काढता, तुम्ही तरुण आहात, श्रीमंतांची अतिक्रमणे अगोदर काढा, असे आव्हान दिले. यावर दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. यावर पालकमंत्री पाटील यांनी हस्तक्षेप करत वाद थोपवला.
दरम्यान, याबाबत पत्रकार बैठकीत विचारले असता मंत्री म्हणाले, आ. पडळकर अभ्यासू आहेत. मात्र, विषय शांतपणे मांडत नाहीत. यामुळे सभागृहात केवळ मारामारीच होण्याची बाकी राहिली होती, असे पाटील म्हणाले.