सांगली : जगप्रसिद्ध असलेल्या मिरजेतील सतारीला आता भारतीय डाक विभागाने टपाल पाकिटासह तिकिटावर स्थान दिले आहे. याचे प्रकाशन मिरज सितार या नावाने करण्यात आले. याबद्दल मिरजेतील सतार बनवणाऱ्या कारागीर बांधवांनी आनंद साजरा केला.

मुंबईत शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात या तिकिटाचे तसेच पाकिटाचे प्रसिद्ध संतूरवादक पंडित सतीश व्यास, पोस्ट विभागाचे प्रमुख सचिन किशोर, पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यामधील विशेष टपाल पाकिटावर मिरजेची ओळख असलेल्या सतारीची चित्रे दर्शवण्यात आली असून त्याचा भौगोलिक महत्त्व सांगणारा उल्लेख केला आहे. तर टपाल तिकिटावर ज्येष्ठ सतारवादक विलायत खान हे मिरजेची सतार वाजवताना दर्शवले आहेत. या तिकिटाची किंमत पाच रुपये आहे.

वीणा प्रकारातील एक तंतुवाद्य असलेली मिरजेची सतार जगभरात प्रसिद्ध आहे. नुकतेच मिरजेच्या सतारीला भौगोलिक मानांकनदेखील मिळाले आहे. आता सोबत टपाल तिकिटावर देखील स्थान मिळाल्यामुळे समस्त मिरजकरांसाठी ही गौरवास्पद बाब ठरली आहे. याकरिता प्रयत्नशील असणारे मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व सर्व तंतुवाद्य निर्माते यांच्या प्रयत्नांचे हे फळ असल्याचे मोहसीन मिरजकर, मुबिन मिरजकर, अल्ताफ पिरजादे यांनी सांगितले.

Story img Loader