सांगली : पावसाच्या हंगामात पहिल्याच महिन्यात पश्चिम घाटातील १२ पैकी सहा धरणांतील पाणीसाठा पन्नास टक्क्याहून अधिक झाला असून सर्वाधिक पाणीसाठा राधानगरी (जि. कोल्हापूर) धरणात ६१ टक्के झाला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून मान्सूनपूर्व आणि जूनच्या सात तारखेपासून मृग नक्षत्राचा जोरदार पाऊस पश्चिम घाटात कोसळत आहे. यामुळे धरणातील पाण्यातही जलदगतीने वाढ झाली आहे.
पश्चिम घाटातील १२ पैकी सहा धरणांत जून संपण्यापूर्वीच पाणीसाठा ५१ ते ६१ टक्के झाला आहे. यामध्ये धरण आणि जलसाठा टक्के असा आहे धोम ५१, उरमोडी ५२, चांदोली ५५, राधानगरी ६१, तुळशी ५५ आणि पाटगाव ५७ टक्के तर कोयनेत ३३, धोमबलकवडी १५, तारळी ३२, दूधगंगा ३० आणि कासारी २३.९ टक्के जलसाठा झाला आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत कोयना येथे ७८ तर पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे ९८ आणि नवजा येथे १०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासून कोयना धरणावर ७६५ मिलीमीटर पाऊस झाला असून चांदोली येथे आज ४० तर एक जूनपासून ५६९ मिलीमीटर पाऊस झाला. तर सर्वाधिक राधानगरी येथे गेल्या २४ तासांत ११६ आणि एक जूनपासून आजअखेर ७९४ मिलीमीटर झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात शिराळा वगळता अन्य तालुक्यांत पावसाने विश्रांती घेतली असून कधी तरी एखादी सर येते. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गात खरीप पेरण्याची धांदल उडाली आहे. हलक्या रानात पेरणीचा घायटा उडाला असून बैलजोडीबरोबरच पेरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे.
शिराळा तालुक्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४०.३ मिलीमीटर पाऊस झाला असून कोकरूड मंडळात ६७.५ आणि चरण मंडळात ६५.५ मिलीमीटर पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. कृष्णा व वारणा नदीच्या खोऱ्यात पावसाचा जोर असल्याने बहे (ता. वाळवा), डिग्रज, सांगली, म्हैसाळ (ता. मिरज) आणि राजापूर (जि. कोल्हापूर) येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.