सांगली : महापालिकेच्यावतीने परिवहन बससेवा सुरू करण्यात येणार असून यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून ५० विद्युत बस मिळणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. पीएम ई बस सेवा सुरू करण्याबाबत तज्ञांच्या व नागरिकांच्या सूचना विचारात घेण्यासाठी महापालिका सभागृहात शनिवार दि. ७ ऑक्टोंबर रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय….




महापालिकेसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच सांगली महापालिकेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून १०० ईबस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तथापि, शहराची गरज लक्षात घेउन ५० बस घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या सर्व बस वीजेवर चालणार्या असल्याने पर्यावरणाचाही प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. सांगलीसाठी मोठ्या व मिनी बस मागविण्यात येणार असून यासाठी शासनाकडून प्रतिकिलो मीटरसाठी २४ ते २० रूपये अनुदान मिळणार आहे.
हेही वाचा >>> पक्षात खरंच फूट पडलीय? भाजपाबरोबर जाण्याचा विचार? शरद पवारांची थेट भूमिका, म्हणाले…
या बससाठी वखारभागातील एक एकर जागेवर वीजभार जोडणी केंद्र सुरू करण्यात येणार असून बसआगारासाठी या ठिकाणी महापालिकेची सुमारे एक एकर जागाही निश्चित करण्यात आली आहे. सांगली, मिरज व कुपवाड शहरापासून आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्येही प्रवासी वाहतूक करण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले असून सद्यस्थितीला औदुंबर, नृसिंहवाडीसह ३९ मार्ग निश्चित करण्यात आले असून दैनंदिन वाहतूक १५ हजार ५०० किलोमीटर होणार आहे. या परिवहन सेवेबाबत नागरिकांच्या अपेक्षा, तज्ञांच्या सूचना यांचा विचार करण्यासाठी शनिवारी महापालिका सभागृहात चर्चांसत्र आयोजित करण्यात आले आहे. येत्या चार महिन्यात ही बससेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त राहूल रोकडे, वैभव साबळे हे उपस्थित होते.