सांगली : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईश्वरपूरमध्ये (इस्लामपूर) पक्षांतराला गती आली असून, माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार व उरुण सेवा सोसायटीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्या व हिरकणी फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा पाटील आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.

नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, उमेदवारीवरून इच्छुकांत तीव्र असंतोषही पाहण्यास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आनंदराव मलगुंडे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी जाहीर केले आहे. तर विरोधकांची नगराध्यक्षपदासाठी अद्याप चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवर एका नावावर एकमत होऊ शकले नसल्याने मुंबईमध्ये हा निर्णय होण्याची चिन्हे आहेत.

या पार्श्वभूमीवर विरोधकांमधील मोहरे आपल्या गटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विरोधकामधील श्री. कुंभार व पाटील या दोन नेत्यांनी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत आमदार पाटील यांनी केले. या वेळी ते म्हणाले, ‘आमच्या पक्षातील काही मंडळी तिकडे गेली असली, तरी आमच्याही त्या गटात काही ओळखी आहेत. नजीकच्या काळात ही मंडळी आम्हाला मदतच करतील.’ मलगुंडे किमान दहा हजार मताधिक्याने विजयी झाले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, महिला नेत्या श्रीमती पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी केले. त्यांच्या प्रवेशामुळे विरोधकांची ताकद वाढली असल्याचा दावा सले-पाटील यांनी केला.