सांगली : जग स्तब्ध करणार्‍या करोनाकाळात सुरू केलेला रुग्णसेवेचा वसा आता रुग्णालयाची स्थापना करून केवळ रुग्णसेवेवरच न थांबता शिक्षण, रोजगार आणि आरोग्याचा अधिकार मिळवून देण्यापर्यंत सांगलीतील ‘नमराह फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुरू आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून बाजूला गेलेल्या मुलींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारण्यापासून ते निराधार वृद्धांना दोन वेळचे जेवण घरपोच देण्यापर्यंत या संस्थेचे कार्यकर्ते मानवसेवा हीच खरी सेवा या भावनेतून करत आहेत.

करोना महामारीच्या अभूतपूर्व संकटाच्या काळात शहरातील गरजू नागरिकांच्या मदतीसाठी ‘नमराह फाऊंडेशन’ने माणुसकीचा हात पुढे केला. संकटाच्या काळात सुरू झालेली ही सेवा पुढे केवळ करोना काळापुरती मर्यादित राहिली नाही. आरोग्य, शिक्षण, रोजगार, अन्नदान, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रांत या सेवाकार्याचा विस्तार झाला.

आज ‘नमराह फाऊंडेशन’चा सेवाप्रवास म्हणजे केवळ विविध उपक्रमांची यादी नाही; तर माणूस केंद्रस्थानी ठेवून उभी राहिलेली सामाजिक बांधिलकीची एक चळवळ आहे. नमराह फाऊंडेशन आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करोना रुग्णालय व करोना केंद्राच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्यात आली. यावेळी मिळालेली सेवा नागरिकांनाही मोलाची ठरली.

करोनाचे संकट टळल्यानंतरही नमराह’ने केलेली रुग्णसेवेची महती आणि सेवाभाव लोकांच्या चर्चेत राहिला. यातून प्रोत्साहन घेत रुग्णसेवेसाठी रुग्णालय उभारणीचा विचार नमराहच्या कार्यकर्त्यांच्या मनात आला. यासाठी स्थानिक नगरसेवक संतोष पाटील यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. नगरसेवक पाटील यांच्या पुढाकाराने महापालिकेने रुग्णालय सुरू करण्यासाठी इमारतही उपलब्ध करून दिली. आज या इमारतीत दहा खाटांचे रुग्णालय सुरू आहे. उपचारांबरोबरच विविध वैद्यकीय चाचण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पॅथॉलॉजी लॅब आणि रुग्णालयाच्या माध्यमातून ही सेवा पुढे नेण्याबरोबरच भविष्यात सवलतीच्या दरात दंतचिकित्सा सेवा उपलब्ध करून देणे आणि आधुनिक डायग्नोस्टिक सेंटर सुरू करणे हे तर उदिष्ट आहेच, पण शिक्षणासाठी तळमळणार्‍यांना मदतीचा हात देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची जिद्द आहे. शिक्षण घेऊन रोजगार करू इच्छिणार्‍या होतकरूसाठी गारमेंटसारखी योजना ‘नमराह’च्या कार्यकर्त्यांच्या मनी आहे. यासाठी दात्यांकडून पाठबळ आणि मदतीचा हात मिळावा यासाठी ‘लोकसत्ता’चा प्रामाणिक प्रयत्न आहे.

आज संस्थेचे रुग्णालय महापालिकेच्या इमारतीत सुरू आहे. काही सेवाभावी वैद्यकीय तज्ज्ञ येथे रुग्णसेवेसाठी येतात. भारती हॉस्पिटलचा स्वतंत्र कक्ष रुग्णसेवेसाठी तत्पर आहे. मात्र अत्यवस्थ रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची गरज भासत आहे. रोगनिदान करण्यासाठी डायग्नोस्टिक सेंटर उभारणीची गरज आहे. समाजातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निधीची गरज आहे. यासाठी ‘नमराह’चे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेतच, पण समाजाचीही जबाबदारी आहे अशा सेवाभावी संस्थांना मदतीचा हात पुढे करण्याची.